पुणे – करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणासाठी मनुष्यबळ कमी पडत असल्याने हे काम आता महापालिका शिक्षकांना लावण्यात आले आहे. या कामासाठी नियुक्ती देत कामावर उपस्थित राहण्याचे आदेश महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सोमवारी दिले.
शहरात करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. तसेच परिमंडळ उपायुक्त विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रीय कार्यालयाकडे क्षेत्रीय स्तरावर सर्वेक्षणासाठी सहाय्यक वैदयकीय अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांच्याकडे कर्मचारी उपलब्ध करून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. डॉ. जाधव यांनी या कामकाजासाठी अतिरिक्त सेवकांची मागणी केली आहे. ती पूर्ण करण्यासाठी आयुक्तांनी प्राथमिक विभागातील सर्व शिक्षक तसेच अन्न निरीक्षकांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले. सोबत 535 शिक्षक आणि 7 अन्न निरीक्षक यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. सध्या शाळा बंद असल्याने शिक्षकांना घरी बसावे लागले होते.
हलगर्जीपणा करणाऱ्यांवर होणार कारवाई वरील कर्मचाऱ्यांनी तत्काळ नेमून दिलेल्या ठिकाणी हजर राहावे. यासाठी स्वतंत्र कार्यमुक्तीच्या आदेशाची आवश्यकता नसल्याचे आदेशात स्पष्ट केले आहे. तसेच नेमून दिलेल्या ठिकाणी हजर न झाल्यास, कामास नकार देणाऱ्या आणि हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.