पुणे – ससून सर्वोपचार रुग्णालयातील वरिष्ठ लिपिक अडीच हजाराची लाच घेताना रंगेहाथ लाच लूचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला. शासकीय सेवकाच्या वैद्यकीय देयकामध्ये त्रुटी न काढता फाइल पूर्ण करुन देण्याकरीता ही लाच घेण्यात आली. याप्रकरणी एका महिला शासकीय सेवकाने तक्रार दिली होती.
गणेश सुरेश गायकवाड (वय 49 वरिष्ठ लिपिक (वर्ग-3), अधीक्षक कार्यालय, ससून रुग्णालय) असे पकडण्यात आलेल्या लिपीकाचे नाव आहे. यातील तक्रारदार या शासकीय सेवक असून त्यांचे एक लाख सात हजार रुपयांचे वैद्यकिय देयक फाइल मंजुरीकरिता वैद्यकीय अवाक-जावक विभागात सादर करण्यात आली होती. वैद्यकिय देयकामध्ये त्रुटी न काढता फाइल पूर्ण करून देण्याकरिता तीन हजारांची लाच मागण्यात आली होती. बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाच मागितल्यास येथे करा संपर्क…
दरम्यान शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांनी कोणतेही शासकीय काम करण्यास फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास तत्काळ अमोल तांबे (पोलीस अधीक्षक, मोबाइल क्र. 9922100712) आणि शीतल जानवे (अपर पोलीस अधीक्षक, मोबाइल क्र. 9921810357) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन उपअधिक्षक नितीन जाधव यांनी केले आहे.