नवी दिल्ली – नवीन संसदचे उद्घाटन राष्ट्रपतींच्याच हस्ते व्हावे अशी मागणी देशातील विरोधी पक्षांनी केली आहे. परंतु सत्ताधारी मोदी सरकारने या मागणीकडे दुर्लक्ष करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच या इमारतीचे उद्घाटन करण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. यावरून काही दिवसांपासून केंद्र सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार वाद सुरु आहे. दरम्यान या उद्घाटनाला विरोध म्हणून एका वकिलाने सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती. परंतु सुप्रीम कोर्टाकडून ही याचिका फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे आता नवीन संसद भवन इमारतीच्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
असे असणार कार्यक्रमाचे वेळापत्रक-
पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 मे रोजी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करणार असून त्याचे वेळापत्रक समोर आले आहे. हा उद्घाटनाचा कार्यक्रम दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात सकाळी ७ वाजल्यापासून हवन पूजनाचा कार्यक्रम सुरू होणार असून तो सकाळी साडेआठ वाजेपर्यंत चालणार आहे.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश आणि सरकारचे काही वरिष्ठ मंत्रीही या पूजा सोहळ्यात सहभागी होणार आहेत. तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत लोकसभेच्या आत सकाळी 8.30 ते 9 या वेळेत सेंगोल लावले जाणार आहे. त्यानंतर सकाळी 9.30 वाजता शंकराचार्यांसह अनेक महान विद्वान, पंडित आणि संत प्रार्थना करणार असून पूजेनंतर मान्यवर नवीन संसद भवनातील लोकसभा कक्ष आणि राज्यसभा सभागृहाच्या परिसराची पाहणी करणार आहेत.
उद्घाटनाचा दुसरा टप्पा दुपारी 12 वाजता सुरु होणार-
पूजा आणि हवनानंतर दुपारी १२ वाजता उद्घाटनाचा कार्यक्रम सुरू होणार आहे. पंतप्रधान मोदींसह सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत लोकसभेच्या सभागृहात राष्ट्रगीत गायले जाणार असून राज्यसभेचे उपसभापती उपराष्ट्रपती हे राष्ट्रपतींच्या संदेशाचे वाचन करणार असून राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखर यांचाही लेखी अभिनंदन संदेश वाचून दाखवला जाणार आहे.