जुन्नर (प्रतिनिधि) – तेजेवाडी (ता. जुन्नर) येथील २ ट्रक्स मधून डिझेल पळविणाऱ्या चोरट्यांना जुन्नर व ओतूर पोलिसांनी पाठलाग करत स्थानिकांच्या मदतीने जेरबंद केले आहे. गुरुवारी (दि. २४) रात्री उशिरा हा थरार घडला असून ओतूर – जुन्नर ते मढ या मार्गाने हा दोन तासांचा पाठलाग करण्यात आला. या घटनेबाबत सोपान विष्णू नायकोडी (रा. तेजेवाडी) यांनी जुन्नर पोलीसांकडे त्यांच्या मालकीच्या एलपी ट्रक्समधून डिझेल चोरी झाल्याची तक्रार नोंदविली आहे.
दरम्यान, गस्तीवरील ओतूर पोलिसांना तेजेवाडी येथे रस्त्याच्या कडेला एक संशयास्पद पीकअप आढळला. जीप मधील व्यक्तींना हटकल्यावर त्यांनी जुन्नरच्या दिशेने पळ काढला, अशी माहिती पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली. याबाबतची माहिती मिळाल्यावर त्यांनी जुन्नर शहराच्या प्रवेशद्वारावर तसेच पंचलिंग चौकात पोलिसांनी गाडी अडविण्याचा प्रयत्न झाला.
पण चोरट्यांनी पोलिसांना हुलकावणी देत गाडी गणेशखिंडीकडे दामटली. तेथून पुढे जात असताना मढ ग्रामस्थांनी रस्त्यावर लावलेल्या अडथळ्यांमुळे चोरटे तीन डिझेल कॅनसह पोलिसांच्या ताब्यात आले. याबाबत पोलिसांनी नरेश भाऊ मोरे व दिनेश विठ्ठल शेळके (दोघे रा. कलमबाड मुरबाड, जि.ठाणे) यांना महिंद्रा पीकसह (एमएच ०५ डीके २२६१) ताब्यात घेतले आहे, अशी माहिती तपासी अंमलदार पुरुषोत्तम थोरात यांनी दिली.