Sanjay Raut : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीनचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी अलीकडेच आपल्या एका भाषणात राम मंदिरावरून मोठे वक्तव्य केले होते. त्यासोबतच मुस्लिम तरुणांना मशिदीचे संरक्षण करावे असे आवाहन केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या वक्तव्यावर बोलताना शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी, “…लोकांच्या मनात जी भीती निर्माण केली जात आहे, ती राजकारण आहे. अयोध्येत राम मंदिर निश्चितच बांधले जाईल पण याचा अर्थ असा नाही कि इतर धर्मियांच्या धार्मिक स्थळ कोणी ताब्यात घेईल.”असे म्हटले आहे. तसेच संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी भाजपवर निशाणा साधत अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे राजकारण केल्याचा आरोप केला होता.
खासदार राऊत यांनी, पक्ष लवकरच निवडणुकीसाठी “प्रभू राम यांना उमेदवार म्हणून घोषित करेल”.असे म्हटले होते. त्यातच राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याच्या निमंत्रणावरील प्रश्नांना उत्तर देताना, राऊत यांनी, “आता फक्त एकच गोष्ट उरली आहे की भाजप निवडणुकीसाठी भगवान राम हेच उमेदवार असतील. .” असे ते म्हणाले.
दरम्यान, असदुद्दीन ओवेसी यांच्या या वादग्रस्त भाषणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते मुस्लिम समाजातील तरुणांना आवाहन करत आहेत. “तुमच्या पाठिंब्याने तुमची ताकद कायम राहो. तुमच्या मशिदीचे संरक्षण करा. मी तुम्हाला सांगतोय तरुणांनो, आपण आपली मशीद गमावली आहे आणि तिथे काय केले जात आहे ते तुम्ही पाहत आहात. असं तरुणांनो, तुम्हाला याविषयी वाईट वाटत नाही का असा सवाल ओवेसी यांनी यावेळी केला होता. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार आज संजय राऊत यांनी घेतला आहे.