Jagannath Temple : देशातील अनेक मंदिरामध्ये ड्रेस कोड लागू करण्यात आले आहे. त्यानंतर आता पुरी येथील जगविख्यात जगन्नाथ मंदिरात (Jagannath Temple) प्रवेश करण्यासाठी मंदिर प्रशासनाने ड्रेसकोड घालून प्रवेश करणे बंधनकारक केले आहे. नुकतेच नववर्षानिमित्त अनेक भाविकांनी येथे मंदिराचे दर्शन घेतले. त्यानंतर आता 1 जानेवारी 2024 पासून येथे ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. या नियमांची येथे अंमलबजावणी केली जात आहे.
ओडीसामधील प्रसिद्ध जनन्नाथ मंदिर प्रशासनाने मंदिरात प्रवेश करू इच्छिणाऱ्या भाविकांसाठी ड्रेस कोड अनिवार्य केला आहे. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सभ्य आणि संपूर्ण अंग झाकलं जाईल असे कपडे घालणं बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार मंदिरात हाफ पँट, चड्डी, फाटलेली जीन्स, स्कर्ट आणि स्लीव्हलेस ड्रेस घालून येणाऱ्या भाविकांना प्रवेश दिला जाणर नाही. त्याचप्रमाणे या मंदिराच्या आवारात गुटखा आणि पान आणि प्लास्टिक आणि पॉलिथिनच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
ड्रेसकोडचे नियम लागू झाल्यामुळे 2024 च्या पहिल्या दिवशी मंदिरात येणारे पुरुष भक्त धोतर आणि टॉवेल परिधान केलेले दिसले आणि महिलांनी साडी किंवा सलवार कमीज घातलेले होते. श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाने यापूर्वी यासंबंधीचा आदेश जारी केला होता तसेच पोलिसांनाही बंदीची अंमलबजावणी करण्यास सांगितले होते. मंदिर परिसराचे पावित्र्य राखण्यासाठी गुटखा आणि पान खाण्यावरही बंदी लागू करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून दंडही वसूल करण्यात येणार आहे.