Sanjay Raut : काही दिवसापूर्वी संसदेत घुसखोरी करून धुळकांड्या फिरवल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना म्हणजे संसदेतील सुरक्षेमधील अक्षम्य चूक असल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, याच घटनेवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. “देशात बेरोजगारी वाढल्याने तरुणांनी संसदेत घुसखोरी केली असल्याचे वक्तव्य करत केंद्र सरकारवर टीका केली आहे.
आज सकाळी माध्यमांशी संवाद साधताना खासदार संजय राऊत यांनी, “देशात केवळ रामलल्लांचं दर्शन घेऊन बेरोजगारीचा प्रश्न सुटणार नाही,” असा घणाघातही यावेळी संजय राऊतांनी केला. राज्य सरकार भांडवलदार, उद्योगपतींची दलाली करत आहे. दरम्यान, धारावी मोर्चाची चेष्टा करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपवर संजय राऊतांनी यावेळी सडकून टीका केली.
पुढे बोलताना त्यांनी,”देशातील मुख्य मुद्दा हा बेरोजगाराचा आहे. शेतकरी कर्जबाजारी होतोय यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी तोडगा द्यावा असे आवाहन संजय राऊत यांनी केले आहे. काल धारावीत जो शिवसेनेचा मोर्चा निघाला त्याची मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी चेष्ठा केली. तुम्ही कोणाची दलाली करताय, उद्योगपतीची, असे म्हणत संजय राऊतांनी सरकारवर हल्लाबोल केला. ही मुंबई भांडवलदारांच्या घशातून वाचवण्यासाठी 106 जणांनी बलिदान दिले असल्याचे म्हणत त्यांनी बलिदानाची आठवण करून दिली आहे.
तसेच संजय राऊत यांनी, “मुंबई मराठी माणसांची आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वत:चं मराठीपण दिल्लीच्या पायाशी गुंडाळून ठेवल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली. शिवसेना मुंबईच्या विकासाशी कधीही आड येत नाही. मुख्यमंत्री काल बोलले मोर्चातील लोक हे बाहेरुन आले आहेत. हो लोक चंद्रावरुन आणले होते असे राऊत म्हणाले. दरम्यान, कालचा मोर्चा हा इशारा मोर्चा होता असेही राऊत म्हणाले.