तळेगाव स्टेशन (वार्ताहर) – तळेगाव नगरपरिषद परिसरातून अत्यावश्यक सेवेसाठी पुणे जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्रात ये-जा करणारे नागरिक, तसेच प्रतिबंधित क्षेत्रातून येणाऱ्या वाहनांची नगरपरिषद तसेच पोलीस ठाण्यामध्ये संबंधितांनी नोंद करावी, असे आवाहन तळेगाव दाभाडे नगरपरिषद व तळेगाव पोलीस ठाणे यांनी केले आहे.
करोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जीवनावश्यक वस्तू सेवा वगळता अन्य व्यक्तींना पुणे तसेच पिंपरी-चिंचवड हद्दीतून ग्रामीण हद्दीत प्रवेशास बंदी आहे.
पुणे शहर व पिंपरी-चिंचवड शहरांना रेडझोन म्हणून शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. परंतु या दोन्ही शहरांत आपत्कालीन कामासाठी ग्रामीण भाग आणि लगतच्या नगरपरिषद हद्दीतील अनेक नागरिक ये-जा करीत आहेत. तसेच अत्यावश्यक सेवेतील शेतमाल, दूध पुरवठ्यासह वैद्यकीय आणि पीएमपीएमएल कर्मचारी देखील संचारबंदी काळात वाहनातून ये-जा करीत असतात. या संबंधितांनी नगरपरिषद प्रशासनाकडे आपल्या वाहनांची तसेच आपलीही नोंद करावी, असे नगरपरिषदेकडून कळविण्यात आले आहे.
नगरपरिषदेस माहिती कळवा
नोंदणीसाठी तळेगाव नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी जयंत मदने (9595791904) तसेच तळेगाव नगरपरिषद कार्यालय (02114-222449) येथे संपर्क साधावा. टोल फ्री क्रमांक – 18002332734.