नवी दिल्ली – संघाच्या फलंदाजीचा प्रशिक्षक बनण्याचा बांगलादेश क्रिकेट मंडळाने (बीसीबी) दिलेला प्रस्ताव भारताचे माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी फेटाळला आहे. माझी काही कौटुंबिक कारणे आहेत तसेच व्यावसायिक करारही आहेत, त्यामुळे सध्यातरी मला हा प्रस्ताव स्वीकारता येणार नाही. मात्र भविष्यात कधी पुन्हा संधी मिळाली तर मी हे काम करायला निश्चितच होकार देईन, असे बांगर यांनी स्पष्ट केले.
भारतीय संघाच्या फलंदाजीचे प्रशिक्षक म्हणून बांगर यांनी चांगले काम केले होते, मात्र गतवर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागल्याने या पराभवाचे खापर बांगर यांच्यावर फोडले गेले व त्यांना या पदावरून हटविण्यात आले होते.