दहा टक्के बस सुरू
पिंपरी – अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणाऱ्यांसाठी पीएमपीएमएलची सेवा सध्या सुरू आहे. ओळखपत्र पाहूनच या कर्मचाऱ्यांना “पीएमपी’ बसमध्ये प्रवेश दिला जात आहे.
करोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने सार्वजनिक वाहतुकीवर बंदी घातली आहे. मात्र अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून पीएमपीएलची सेवा सध्या सुरू आहे. प्रत्येक बसवर “अत्यावश्यक सेवा’ म्हणून फलकही लावण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवेत काम करणारा कर्मचारी आहे की नाही याची खातरजमा करण्यासाठी प्रत्येकाचे ओळखपत्र तपासूनच बसमध्ये प्रवेश दिला जात आहे. सर्वसामान्य नागरिकांना या बसमध्ये प्रवेश दिला जात नाही.
एका बसमध्ये दहा प्रवासी झाल्यानंतर ती बस सोडण्यात येते, अशी माहिती पीएमपीएलच्या कर्मचाऱ्यांनी दिली. यामुळे शहरातील अन्य भागात बसची वाट पाहात थांबलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना बससाठी महामार्ग गाठावा लागतो आहे. कारण शहरातील प्रमुख मार्गावरच ही अत्यावश्यक बससेवा सध्या सुरू आहे.
“करोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मंगळवार (दि.24) पासून पुढील आदेशापर्यंत फक्त दहा टक्के बस शेड्यूल चालू ठेवताना अत्यावश्यक सेवेमधील कर्मचाऱ्यांकरताच बससेवा पुरविण्यात येणार आहे. ही बससेवा जनतेसाठी उपलब्ध नसून फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, शासकीय व खासगी रुग्णालयातील कर्मचारी, पोलीस, बॅंक, अग्निशामक दल, महावितरण, सफाई कर्मचारी, विद्युत कर्मचारी, पाणीपुरवठा कर्मचारी इत्यादी तसेच रुग्ण नातेवाईक फक्त यांच्यासाठीच ही बससेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
“पीएमपी’ची मार्गदर्शिका
– सर्व पास केंद्र बंद ठेवण्यात येणार आहे.
– सर्व रातराणी बस बंद ठेवण्यात येऊन फक्त अत्यावश्यक सेवा कर्मचारी यांचे मागणीनुसार देण्यात येईल.
– पुणे व पिंपरी-चिंचवड मनपा हद्दीबाहेरील बस बंद करण्यात येत आहे.
– स्थानकावर आवश्यकतेनुसार बस नेमण्यात आल्या आहेत. या बस वेळापत्रकाप्रमाणे न धावता गरजेनुसार सोडण्यात येईल.
– बीआरटी मार्गावर फक्त सिक्युरिटी सेवक नेमण्यात येतील व वॉडर्न सेवक नेमण्यात येणार नाहीत
– प्रवाशांना एक आड एक सीट सोडूनच बसता येईल.