पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – प्रसिद्ध धातूशास्त्रज्ञ आणि प्राध्यापक सुहास केशव पाकणीकर यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. प्रसिद्ध औद्योगिक प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर हे त्यांचे पुतणे होत.
धातूशास्त्र अभियांत्रिकीमध्ये तत्कालीन पुणे विद्यापीठातून पदवी घेऊन पाकणीकर यांनी १५ वर्षे अभियंता म्हणून विविध कंपन्यांमध्ये काम केले. या काळात दुर्गापूर स्टील प्लांटमध्ये पोलादनिर्मिती क्षेत्रात रशियन तज्ज्ञांबरोबर काम करण्याचा अनुभव त्यांना मिळाला.
१९७३ ते २००० या काळात त्यांनी पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतनच्या धातूशास्त्र विभाग येथे अधिव्याख्याता आणि विभागप्रमुख म्हणून काम केले. १९९८ मध्ये त्यांना महाराष्ट्र शासनाचा उच्च आणि तंत्रशिक्षण विभागातील उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
२००० ते २०१९ या काळात आपल्या अनुभवाचा उपयोग करून त्यांनी अनेक कंपन्यांना धातूशास्त्र तज्ज्ञ म्हणून मदत केली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फाउंड्रीमेन या संस्थेशी ते संलग्न होते. इंजिनिअरिंग ऑटो पार्ट्समधील धातूशास्त्र संबंधित दोष ओळखण्याची हातोटी असल्यामुळे ते उद्योग क्षेत्रात सल्लागार म्हणून प्रसिद्ध होते.