पिंपरी (प्रतिनिधी) – सांगवी फाटा येथील जिल्हा रुग्णालयात सोमवारी सांगवीतील दोघांना तर, निमोणे (ता. शिरूर) येथील एकाला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. पुण्यातील गंजपेठ आणि जनवाडी येथील दोन ज्येष्ठ नागरिकांसह वेहेरगाव (ता. मावळ) येथील 28 वर्षीय तरुण करोनामुक्त झाला. त्यामुळे त्यांना आज घरी सोडण्यात आले.
जुनी सांगवी येथील 38 वर्षीय पुरुषासह नवी सांगवी येथील 28 वर्षीय तरुणाचा बाधितांमध्ये समावेश आहे. निमोणे येथील 48 वर्षीय पुरुषाचा करोना अहवाल देखील पॉझिटिव्ह आला. पुणे-गंजपेठ येथील 66 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने करोनावर मात केली. त्यांना पुण्यातील नायडू रुग्णालयातून उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविले होते. त्यांना न्यूमोनिया झाला होता. त्यांच्यावर सुरवातीला काही दिवस अतिदक्षता विभागात उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना वॉर्डमध्ये हलविले होते.
पुणे-जनवाडी येथील 79 वर्षीय ज्येष्ठ नागरिकावर देखील सुरवातीला रुग्णालयातील अतिदक्षता विभागातच उपचार करण्यात आले. काही दिवसानंतर त्यांना वॉर्डात हलविण्यात आले. त्यांना उच्च रक्तदाब आणि मधुमेह हे आजार देखील आहे. तरीही, त्यांनी करोनावर यशस्वी मात केली. वेहेरगाव (ता. मावळ) येथील तरुण देखील करोनावर मात करून आज घरी परतला. रुग्णालयामध्ये सध्या 22 जणांवर उपचार सुरू आहेत. तर, आत्तापर्यंत 32 जण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.