Sangali Loksabha Election 2024 – यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रामध्ये रंगतदार लढती होणार आहेत. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर होणाऱ्या या पहिल्याच निवडणुका असून सामान्य मतदार आपले वजन कोणाच्या पारड्यात टाकतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. अशातच मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील दोन प्रमुख पक्ष शिवसेना (ठाकरे) व काँग्रेस यांच्यामध्ये सांगलीच्या जागेवरून जुंपली होती. मात्र अखेर आज या वादावर तोडगा निघाला असून काँग्रेसला ही जागा सोडावी लागली आहे.
सांगली येथून उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच चंद्रहार पाटील यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली होती. मात्र स्थानिक काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांनी याला कडाडून विरोध केला होता. ही जागा काँग्रेसच्याच वाट्याला यावी अशी मागणी लावून धरण्यात आली होती. काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी सांगलीच्या जागेसाठी दिल्ली गाठली. मात्र दिल्लीतूनही त्यांना दिलासा मिळू शकला नाही.
मुंबईतील शिवालय कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत माविआच्या जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर करण्यात आला. अपेक्षेप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला सर्वाधिक २१, त्याखालोखाल काँग्रेसला १७ तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला १० जागा देण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.
विशाल पाटील अपक्ष लढणार? | Sangali Loksabha Election 2024
आज जाहीर करण्यात आलेल्या जागावाटपामध्ये शिवसेना ठाकरे गटच सांगली लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये, ठाकरे यांच्याकडून पैलवान चंद्रहार पाटील विरुद्ध भाजपचे संजयकाका पाटील असा सामना होणार आहे.
सांगलीसाठी विशाल पाटील हे काँग्रेसकडून इच्छूक होते. मात्र ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने ते अपेक्षा निवडणूक लढण्याच्या तयारीत असल्याचे समजते. आज झालेल्या माविआच्या पत्रकारपरिषदेनंतर सांगलीची जागा शिवसेनेला गेल्याबाबत शिक्कामोर्तब होताच, विशाल पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून, ‘आमचं काय चुकलं?’ अशी बॅनरबाजी करण्यात आली आहे. तसेच आता फैसला जनतेच्या न्यायालयात असे म्हणत अपक्ष निवडणूक लढणार असल्याचे सुचवण्यात आले आहे.
२०१९ लोकसभेत काय चित्र? | Sangali Loksabha Election 2024
२०१९ लोकसभा निवडणुकांमध्ये सांगली येथून भाजपच्या संजयकाका पाटील यांनी बाजी मारली होती. त्यावेळी स्वाभिमानी पक्षाच्या तिकिटावर लढलेल्या विशाल पाटील यांना पराभव स्वीयकाराव लागला होता, ते मतांच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते.
तर, २०१९ सांगली लोकसभेची निवडणूक वंचित बहुजन आघाडीकडून लढवलेले व सध्या भाजप विधानपरिषद आमदार असलेले गोपीचंद पडळकर यांनी चांगली कामगिरी करत ३ लाखांहून अधिक मतं मिळवली होती.