तर साने यांनी राजकीय संन्यास घ्यावा – शेंडगे

जयंतीवरून वाद पेटला ः नगरसेविका शेंडगे यांनी विरोधी पक्षनेत्यांना दिले आव्हान

पिंपरी – पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर जयंती आयोजित करण्यावरून वाद पेटला आहे. माजी नगरसेवक आणि धनगर समाज महासंघाचे अध्यक्ष राजू दुर्गे यांनी जयंतीच्या कार्यक्रमात भ्रष्टाचार होत असल्याचा आणि नगरसेविका आशा शेंडगे या आपल्या पदाचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप केला आहे. विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी देखील हा मुद्दा उचलून धरल्याने चांगलाच वाद पेटला आहे. आपल्यावरील आरोप सिद्ध न करु शकल्यास साने यांनी राजकीय संन्यास घेण्याची तयारी ठेवण्याचे खुले आव्हान शेडगे यांनी दिले आहे. या वादात आयोजक मंडळाच्या काही पदाधिकाऱ्यांनी मात्र आमचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याची भूमिका घेतली आहे.

गेल्या वर्षी मोरवाडी चौकात अहिल्यादेवी होळकर यांची जयंती दोन स्वतंत्र मंडळांनी महापालिकेच्या संयुक्‍त विद्यमाने साजरी केली. आशा शेडगे या नगरसेविका असल्याने त्या अध्यक्ष असलेल्या मंडळाला जयंतीच्या कार्यक्रमांची रक्कम घेण्याचा अधिकार नाही. त्यामुळे ही रक्कम घेतल्याने त्या नगरसेवक पदासाठी अपात्र ठरू शकतात, अशी भूमिका दुर्गे आणि साने यांनी मांडली आहे. स्टेज तसेच गजी नृत्य आणि नाटकासाठी बाजारभावापेक्षा अधिक अव्वाच्या सव्वा रक्कम दिल्याने त्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दुसरीकडे नगरसेविका शेडगे यांनी देखील आपल्या संस्थेने जयंती कार्यक्रमासाठी महापालिकेकडून एक रुपयाही घेतला नसल्याचा दावा केला आहे. साने यांनी आरोप सिद्ध केल्यास आपण सन्यास घेऊ, अन्यथा साने यांनी राजीनामा द्यावा, असे खुले आव्हान दिले आहे.

इतरांनाही खेचले वादात दरम्यान, या वादात अन्य काही पदाधिकाऱ्यांबरोबरच रासपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष भारत महानवर आणि गणेश पाडुळे हे समाजाचे प्रतिनिधी आपल्यासोबत असल्याचा दावा शेडगे यांनी केला होता. मात्र या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी आमचा शेडगे यांच्या संस्थेशी अथवा आयोजनामध्ये कोणत्याही प्रकारचा सहभाग नसल्याचे लेखी पत्रेच प्रसारमाध्यमांना सादर केली. दरम्यान नगरसेविका आशा शेडगे यांनी या वादात अन्य काही नगरसेवकांना खेचले आहे. त्यांनी नगरसेविका मंगला कदम यांचा नामोल्लेख टाळत, शहरात असलेल्या एका मतिमंद मुलांच्या संस्थेच्या अध्यक्षा राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेविका असून अनुदान घेणाऱ्या अनेक गणेश मंडळांचे अध्यक्ष विद्यमान नगरसेवकच असल्याची बाब शेडगे यांनी निदर्शनास आणून दिली. तसेच हा जयंती सोहळा समाजातील मंडळे आणि महापालिकेचा संयुक्‍त उपक्रम असल्याने महाराष्ट्र महापालिका अधिनियम 10 (1फ) अन्वये कोणताही लोकप्रतिनिधी अपात्र ठरत नाही, असे त्या म्हणाल्या. तसेच दत्ता साने यांना माहिती देणाऱ्यांनी पतसंस्था बुडवल्या असल्याचा आणि समाज बांधवांकडून पैसे उकळले असल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी केला आहे.

पुरावे सादर करू दत्ता साने यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, कोणत्याही समाजाच्या महापुरुषांची जयंती साजरी करण्याला विरोध नाही. आशा शेडगेंकडून विषय भरकटविला जात आहे. त्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात होणाऱ्या आर्थिक देवाण-घेवाणीत असलेल्या अनियमिततेवर बोलावे. त्याला प्रत्युत्तर देण्यास आम्ही समर्थ आहोत. याबाबत राजू दुर्गे यांनी समाजाचा शेडगे यांच्या संस्थेला विरोध असल्यानेच दोन जयंत्या साजऱ्या झाल्याची बाब निदर्शनास आणून दिली. त्या समाजाची दिशाभूल करत आहेत, असे गंभीर आरोप करत दुर्गे यांनी पुराव्यादाखल माहिती अधिकारात सर्व कागदपत्रे काढली आहेत व ती प्रसारमाध्यमांना सादर करणार आहोत, असा दावाही केला आहे.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here