सभापतिपदासाठी रस्सीखेच वाढली

लोकसभा निकालानंतर हालचाली ः विषय समितीतील इच्छुकांची नेत्यांकडे “फिल्डिंग’


विधानसभेच्या पार्श्‍वभूमीवर नाराजी दूर करण्याचा प्रयत्न
तीन महिन्यांवर विधानसभेची निवडणूक येऊन ठेपली आहे. भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांची उमेदवारी जवळपास निश्‍चित मानली जात आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर समर्थक नाराज होऊ नये याची दक्षता आमदारांना घ्यावी लागणार आहे. त्यांची नाराजी आमदारांना परवडणारी नाही. त्यामुळे आमदार कोणाला सभापतिपद देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधी, महिला व बालकल्याण, शहर सुधारणा आणि क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीच्या सभापतिपदासाठी सत्ताधारी नगरसेवकांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. विषय समितीचे सभापतीपद मिळावे, यासाठी इच्छुक सदस्यांनी नेत्यांकडे “फिल्डिंग’ लावण्यास सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नेते कोणाला सभापतिपदाची संधी देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मित्र पक्ष शिवसेनेला एखाद्या समितीचे सभापतीपद देऊन सत्तेत सहभागी करुन घेतले जाते का? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.

महापालिकेच्या चारही विषय समितीच्या सदस्यांची मुदत संपल्याने सोमवारी (दि. 20) झालेल्या महासभेत नवीन सदस्यांची निवड करण्यात आली. या चारही समित्यांमध्ये नऊ सदस्य असून पक्षीय बलाबलानुसार सत्ताधारी भाजपचे पाच, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तीन आणि शिवसेनेच्या एका सदस्याची प्रत्येक समितीत निवड झाली आहे. सर्वाधिक भाजपचे नगरसेवक असल्याने भाजपचाच सभापती होणार हे निश्‍चित आहे. भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि भोसरीचे भाजप सहयोगी आमदार महेश लांडगे यांच्याकडे महापालिकेची सूत्रे असून दोघांनी सत्तेच्या वाटपाचा जणू काही फॉर्म्युलाच ठरवून घेतला आहे. दोघांच्या समर्थकांना महापालिकेत महत्वाची पदे दिली जातात. विधानसभा निवडणूक जवळ आली असून त्याच्या पार्श्‍वभूमीवर आमदार कोणती समिती आपल्या समर्थकांकडे ठेवतात हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिकेत स्थायी समितीनंतर विधी समिती सर्वांत महत्वाची समिती मानली जाते. विधीचे सभापतीपद सलग दोन वर्ष आमदार जगताप यांच्या समर्थकांकडे होते. यावेळी आमदार लांडगे यांच्या समर्थकाला विधीचे सभापतीपद मिळण्याची शक्‍यता आहे. “विधी’त अश्‍विनी बोबडे, कमल घोलप, उषा ढोरे, मनीषा पवार, अनुराधा गोरखे यांची वर्णी लागली आहे. यांच्यापैकी अश्‍विनी बोबडे यांना सभापतीपद दिले जाऊ शकते. यापूर्वी विधी समितीत निवड न झाल्यामुळे त्यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.

महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदासाठी सुजाता पालांडे आणि भीमाबाई फुगे यांच्यात चुरस आहे. तर, शहर सुधारणा समितीचे सभापती आशा शेंडगे यांना दिले जाणार असल्याचे जवळपास निश्‍चित आहे. क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीच्या सभापतीपदासाठी विकास डोळस आणि तुषार हिंगे यांच्यात चुरस आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)