नारायणगाव (पुणे) – विडीवर संभाजीमहाराजांचे नाव किंवा छायाचित्र वापरू नये, यासाठी छोट्या पडद्यावरील “संभाजी’ आक्रमक झाले आहेत.
साबळे आणि वाघिरे कंपनीच्या विडी उत्पादक कंपनीला विड्याच्या बंडलावर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा वापर करण्यास मनाई करण्याची मागणी शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याकडे केली आहे.
छत्रपती संभाजी महाराज हे राष्ट्रपुरुष व समस्त मराठी जनतेचे स्फूर्तीस्थान आहेत. त्यांच्या नावाने अशाप्रकारे विड्यांची बंडलं बाजारात आणणे ही छत्रपती संभाजी महाराजांच नव्हे तर महाराष्ट्रासह भारतातील जनतेचा अपमान आहे. आपल्या उत्पादनाची विक्री करण्यासाठी राष्ट्रपुरुषांच्या नावाचा व फोटोचा उपयोग करणे अजिबात समर्थनीय नाही. यामुळे शंभूप्रेमी जनतेमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे. संबंधित उत्पादकांना याबाबतची कल्पना देऊन शंभूप्रेमी मंडळींनी आपली नाराजी वेळोवेळी व्यक्त करुन विडीचे नाव बदलण्याची विनंती केली; परंतु साबळे आणि वाघिरे कंपनीने याला कसलाही प्रतिसाद दिलेला नाही. यामुळे या विषयावरुन शिवप्रेमी संघटना व जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे.
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे नाव विडी सारख्या उत्पादनास असणे ही प्रत्येक राष्ट्राभिमानी नागरिकासाठी खेदाची व संतापजनक बाब आहे. यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या विडी कंपनीला विडीचे नाव वापर करण्यास मनाई करण्याचे निर्देश तात्काळ द्यावेत, अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली आहे.