नवी दिल्ली – गेल्या 24 तासात देशभरामध्ये 74 हजार पेक्षा अधिक कोविड-19 रुग्ण बरे झाले आहेत. याबरोबरच देशामध्ये आता पूर्ण बरे झालेल्या एकूण रूग्णांचा आकडा 33 लाख 98 हजार पेक्षा अधिक झाला आहे.
करोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 77.77 टक्के झाले आहे. तसेच दर आठवड्याला रूग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. यामध्ये जुलैमध्ये 1 लाख 53 हजारपेक्षा अधिक रूग्ण बरे झाले होते. आता या प्रमाणात सुधारणा झाली आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये 4 लाख 84 हजारापेक्षा अधिक रूग्ण बरे झाले आहेत.
गेल्या 24 तासांमध्ये करोनामुळे संक्रमित झालेली 89 हजार 706 प्रकरणे समोर आली आहेत. त्यामध्ये एकट्या महाराष्ट्रामध्ये 20 हजार पेक्षा जास्त करोनाचे रूग्ण आढळले आहेत. तर आंध्र प्रदेशामध्ये 10 हजारपेक्षा जास्त रूग्ण आढळले आहेत. नवीन करोना रूग्णांपैकी 60 टक्के रूग्ण पाच राज्यांमध्ये सापडले आहेत.
सध्या देशामध्ये 8 लाख 97 हजारापेक्षा अधिक संक्रमित रूग्ण आहेत. त्यामध्ये सर्वात जास्त 2 लाख 40 हजारांपेक्षा अधिक रूग्ण महाराष्ट्रात आहेत. त्याखालोखाल कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये प्रत्येकी 96 हजार पेक्षा जास्त रूग्ण आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू या पाच राज्यांमध्ये मिळून देशातल्या एकूण कोविड-19 रूग्णांपैकी 61 टक्के संक्रमित रूग्ण आहेत.
गेल्या 24 तासांत देशात करोनामुुळे 1,115 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. महाराष्ट्रात 380 जणांचे आणि त्याखालोखाल कर्नाटकमधल्या 146 जणांचे निधन झाले आहे. तर तामिळनाडूमध्ये 87 जणांचे निधन झाले आहे.