पुणे – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल संभाजी भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. यासंदर्भात राज्यभरात एक ते दोन तक्रारी दाखल आहेत. दरम्यान, गुरुवारी महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात संभाजी भिडे यांच्या विरोधात तक्रार अर्ज दाखल केला. पोलिसांनी कायदेशीर सल्ला घेऊन पुढील प्रक्रिया करण्यात येईल, असे आश्वासन तुषार गांधी यांना दिले.
तुषार गांधी हे ऍड. असीम सरोदे यांच्या मार्फत तक्रार दाखल करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी सांगितले की, माझे पणजोबा महात्मा गांधी हे सार्वजनीक व्यक्तीमत्व आहे. आजवर त्यांच्यावर टीका टीपण्णी होत होती. मात्र, आता त्यांच्या आईच्या चारित्र्यावरच संशय घेण्यात आला आहे. ही बाब लांच्छनास्पद आहे. माझ्या परिवारातील मातेची बदनामी होत असेल तर मी शांत बसणार नाही. विधानसभेत उपमुख्यमंत्र्यांनी कडक शब्दांत समाचार घेतला तसेच तपास करण्याचे आश्वासन दिले होते. पण, कारवाई झाली नाही, त्यांचे पाय का बांधले गेले आणि कोणी बांधले? हा प्रश्न आहे. आमचा विश्वास न्यायव्यवस्थेवर असल्याचेही गांधी म्हणाले.