पिंपरी – गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी पोलीस यंत्रणा तडीपार कारवाईचे हत्यार जरी उपसत असली तरी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातून तडीपार केलेले बहुतांश गुंड घरी मुक्कामीच आहेत. केवळ कागदोपत्रीच कारवाई होताना दिसत आहे. पोलीस ठाण्यात या गुंडांची “हजेरी’ नावालाच ठरत असल्याचे चित्र आहे. पडद्याआड राहून त्यांच्या गुन्हेगारी कारवाया सुरूच आहेत. सध्या आयुक्तालयाच्या हद्दीतून 65 गुंड तडीपार आहेत. मात्र गेल्या सात महिन्यांत तडीपारीच्या आदेशाचा भंग करुन शहरात आला म्हणून 83 गुन्हे दाखल झाले आहेत. याचाच अर्थ की तडीपार करुन आणि पुन्हा शहरात आल्याने कारवाई केल्यानंतरही तडीपार गुंड शहरात येऊन राहत आहेत.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी असे गुन्हे करणाऱ्या अनेक टोळ्या सक्रिय आहेत. टोळी प्रमुखांसह त्यांच्या साथीदारांवर अनेकदा अटकेची कारवाई केली जाते. तरीही त्यांच्या गुन्हेगारी कारवाया सुरूच राहतात. मग या टोळ्यांतील गुन्हेगारांना तडीपार करण्याचा निर्णय घेतला जातो. संबंधित गुन्हेगारांवर किती गुन्हे दाखल आहेत, याचा सारा सातबारा काढला जातो. पोलीस ठाणे स्तरावर तडीपार कारवाईचा प्रस्ताव तयार करण्यात येतो.
अशी आहे तडीपारीची प्रक्रिया
तडीपारचा प्रस्ताव सहायक आयुक्तांना सादर केला जातो. मग या प्रस्तावावर सुनावणी सुरू होते. गुन्हेगारांना सुनावणीला हजर होण्यासाठी नोटीस बजावली जाते. चार-सहा महिने सुनावणी सुरू राहते. अंतिम सुनावणीला या गुन्हेगारांना पुणे जिल्ह्यातून तडीपार केल्याचा आदेश बजावला जातो.
अशी होते तडीपारीच्या आदेशाची अंमलबजावणी
पोलीस या गुन्हेगारांना ताब्यात घेतात. त्यांना तडीपार केल्याची नोटीस देतात. पुणे जिल्ह्याच्या बाहेर “कुठे राहणार आहेस’, अशी त्याच्याकडे विचारणा केली जाते. तो सांगेल आणि जिथे राहणार आहे, तेथील पत्ता घेतला जातो. त्यानंतर त्याला त्याठिकाणी स्वतः पोलीस सोडून येतात. तेथील पोलीस ठाण्यात पंधरा दिवसांतून एकदा त्याची हजेरी लावली जाते.
कसे सापडतात तडीपार गुंड
वाढत्या गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी पोलिसांची ही कारवाई कौतुकास्पद आहे. पण, या कारवाईचा नुसता फार्सच ठरत आहेत. तडीपार केलेले बहुतांश गुंड घरी मुक्कामीच असतात, हे पोलिसांनी दाखल केलेल्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. नाकाबंदी, कोम्बिंग ऑपरेशन, ऑल आऊट ऑपरेशन तसेच गस्त घालताना अनेकदा तडीपार गुंड येथे सापडले आहेत.
आणखी एक गुन्हा दाखल
त्यांच्यावर तडीपार आदेशाचा भंग केल्याप्रकरणी नव्याने भा. द. वि. कलम 142 अन्वये गुन्हा दाखल केला जातो. पुन्हा त्यांना अटक करून जिल्ह्याबाहेर सोडले जाते. पोलीस पिंपरी चिंचवड शहरात पोहोचत नाहीत, तोपर्यंत हे गुन्हेगार खासगी गाडीने पुन्हा शहरात आलेले असतात. अशा घटना सातत्याने घडत असल्याचे चित्र आहे.
“एक्स ट्रॅकर’ नावालाच
तडीपार गुंडाच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांनी तडीपार गुंडांच्या मोबाइलमध्ये “एक्स ट्रॅकर’ नावाचे ऍप डाऊनलोड केले होते. दररोज त्या गुंडाने आपला फोटो या ऍपमध्ये काढायचा होता. त्यावरून त्या गुंडाचे लोकेशन पोलिसांना कळणार होते. मात्र गुंड फोटो काढल्यावर तो मोबाइल गावी ठेवून रातोरात शहरात येऊन गुन्हे करून जात असल्याचे निदर्शनास आले. मात्र आता हा प्रयोग बासनात गुंडाळला आहे.?
तडीपारी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी दाखल झालेले गुन्हे
पिंपरी (17), वाकड (12), देहूरोड (9), निगडी (9), आळंदी (6), चिंचवड (5), चाकण (5), भोसरी (4), भोसरी एमआयडीसी (4), सांगवी (3), महाळुंगे (3), दिघी (2), शिरगाव (1), तळेगाव दाभाडे (1), रावेत (1) हिंजवडी (1)