औरंगाबाद: एड्युरन्स् मराठवाडा-एमएसएलटीए टेनिस सेंटर (इएमएमटीसी) यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए – योनेक्स् सनराईज् 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात वैभव श्रीराम, अधिरी अवल व सिद्धार्थ मराठे यांनी तर मुलींच्या गटात साहिरा सिंग, परी चव्हाण, सायना देशपांडे व अमोदीनी नाईक यांनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
या स्पर्धेत उप-उपांत्यपूर्व फेरीत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या बिगर मानांकित वैभव श्रीरामने हरियाणाच्या अव्वल मानांकित वंश नांदलचा 3-6, 6-1, 7-5 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. दिल्लीच्या अधिरी अवलने चौथ्या मानांकित महाराष्ट्रच्या वितीन राठीचा 6-2, 6-2 असा तर महाराष्ट्राच्या सिद्धार्थ मराठेने कर्नाटक नवव्या मानांकित स्कंद रावचा 6-2, 6-2 असा सहज पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली.
मुलींच्या गटात उप-उपांत्यपूर्व फेरीत पंजाबच्या बिगर मानांकित साहिरा सिंगने दिल्लीच्या तिसऱ्या मानांकित रिया सचदेवचा 6-2,6-4 असा पराभव करत खळबळजनक निकालाची नोंद केली. महाराष्ट्राच्या नवव्या मानांकित परी चव्हाणने तेलंगणाच्या सातव्या मानांकित सौम्या रोंडेचा 6-4, 6-0 असा पराभव केला.
सायना देशपांडेने उत्तर प्रदेशच्या सौमिती वर्माचा 6-3, 6-3 असा तर कर्नाटकच्या अमोदीनी नाईकने दिल्लीच्या पाचव्या मानांकित समीक्षा दबसचा 6-2,7-6(7) असा टायब्रेकमध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.