कराड – आगाशिवनगर- मलकापूर येथे बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास आगाशिवनगर येथील जॅकवेलकडे जाणा-या रस्त्यावर युवकाचा गोळ्या झाडून खून झाला.
विकास रघुनाथ लाखे (रा. दांगटवस्ती मलकापूर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. दोन दुचाकीवरून आलेल्या लोकांनी बेछूट गोळीबार केला. यामध्ये सुमारे चार ते पाच गोळ्या विकास लाखे याला लागल्या. गोळीबारानंतर विकास लाखे याला तत्काळ कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मात्र, उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव दाखल झाले. टोळीयुद्ध व वर्चस्ववादातून ही घटना घडल्याची चर्चा आहे. गोळीबाराच्या घटनेमुळे आगाशिवनगर मलकापूरात एकच खळबळ उडाली आहे.