शिर्डी -श्री साईबाबा संस्थानतर्फे आयोजित केलेल्या साई बाबांच्या 102 व्या पुण्यतिथी उत्सवास आज उत्साही वातावरणात सुरुवात झाली. उत्सवानिमित्त श्री साईबाबा समाधी मंदिर व परिसरात विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली.
उत्सवाच्या पहिल्या दिवशी पहाटे 4.30 वाजता श्रींची काकड आरती झाली. त्यानंतर पहाटे 5 वाजता श्री साईबाबांच्या प्रतीमेची व श्री साईसच्चरित या ग्रंथाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी पोथी, तदर्थ समितीचे सदस्य दिलीप स्वामी यांनी वीणा आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे व मंदिर प्रमुख रमेश चौधरी यांनी प्रतिमा हातात धरुन सहभाग नोंदवला. मिरवणूक द्वारकामाई मंदिरात आल्यानंतर श्री साईसच्चरित या ग्रंथाच्या अखंड पारायणास प्रारंभ झाला. सकाळी 6 वाजता समाधी मंदिरात बगाटे व त्यांच्या पत्नी संगीता यांच्या हस्ते श्रींची पाद्यपूजा करण्यात आली.
उद्या (दि.25) उत्सवाच्या मुख्य दिवशी पहाटे 4 वाजता श्रींची काकड आरती, श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणूक, पहाटे 5.20 वाजता श्रींचे मंगल स्नान, सकाळी 6 वाजता श्रींची पाद्यपूजा, सकाळी 8.30 ते 9 वाजता भिक्षा झोळी कार्यक्रम, सकाळी 10 वाजता कीर्तनाचा कार्यक्रम, तसेच सकाळी 10.30 वाजता श्रींच्या समाधी समोर आराधना विधीचा कार्यक्रम होईल. दुपारी 12.30 वाजता माध्यान्ह आरती, तर सायंकाळी 5 वाजता खंडोबा मंदिर येथे सीमोल्लंघन कार्यक्रम, सायंकाळी 6 वाजता धूपारती होईल. रात्रौ 10.30 वाजता श्रींची शेजारती होईल.