चेन्नई -आशियाई ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या पुरुष व महिला संघांनी उपांत्य फेरीत आपापले सामने जिंकत अंतिम फेरी गाठली आहे.
पूरुष संघाने किर्गिस्तानवर 2.5-1.5 अशी तर, महिला संघाने मंगोलियावर 3.5-0.5 तसेच सांघिक गटात 4-0 अशी सहज मात केली. पुरुष गटात बी. अधिबनने तर महिला गटात आर. वैशालीने आपले वर्चस्व कायम राखले.
पुरुष गटात बी. अधिबनने इराणच्या रिनत जुम्बायेव्हचा पराभव केला. अन्य सामन्यात शशीकिरणला डेनिस मखानेव्हकडून पराभव पत्करावा लागला. आर. वैशालीने पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेची साक्ष देताना मंगोलियाच्या बातखुयाग मुंगुतुळवर मात केली.
वैशालीसह भक्ती कुलकर्णी, पद्मिनी राऊत व पी. व्ही. नंदीथा यांनी सांघिक द्वितीय गटात मंगोलियाचा 4-0 असा पराभव केला. या स्पर्धेत रविवारी भारताच्या पुरुष संघाचा सामना ऑस्ट्रेलियाशी तर, महिला संघाचा सामना इंडोनेशियाशी होणार आहे.