कोपरगाव – सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी जिल्हा बॅंकेचे संचालक व युवानेते विवेक बिपीन कोल्हे तर उपाध्यक्षपदी रमेश घोडेराव यांची गुरूवारी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी उज्वला गाडेकर तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक नामदेव ठोंबळ यांनी काम पाहिले.
प्रारंभी कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांनी बिनविरोध निवडलेल्या सर्व संचालकांचे स्वागत केले. विवेक कोल्हे यांच्या नावाची सुचना संचालक त्र्यंबकराव सरोदे यांनी केली. त्यास संचालक निवृत्ती बनकर यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी रमेश घोडेराव यांच्या नावाची सुचना संचालक विलासराव वाबळे यांनी केली तर त्यास संचालक बाळासाहेब वक्ते यांनी अनुमोदन दिले. यावेळी संचालक सर्वश्री विश्वासराव महाले, ज्ञानेश्वर परजणे, बापूसाहेब बारहाते, निलेश देवकर, ज्ञानदेव औताडे, रमेश आभाळे, राजेंद्र कोळपे, ज्ञानेश्वर होन, मनेष गाडे, विलासराव माळी, सतिष आव्हाड, उषा संजय औताडे, सोनिया बाळासाहेब पानगव्हाणे यांच्यासह अमृत संजीवनीचे अध्यक्ष पराग संधान, शिवाजीराव वक्ते, साईंनाथ रोहमारे, प्रदिप नवले, केशवराव भवर, कामगार नेते मनोहर शिंदे, वेणुनाथ बोळीज, उपाध्यक्ष गणपतराव दवंगे आदी उपस्थित होते.
विवेक कोल्हे यावेळी म्हणाले, माजीमंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांनी संजीवनीचा नावलौकीक मोठ्या संघर्षाने जपला. तळहाताच्या फोडाप्रमाणे त्यांनी संस्था जोपासून त्याचा वटवृक्ष निर्माण केला. सहकारात संजीवनीने पथदर्शी प्रकल्पाची सुरूवात सर्वप्रथम करत ते यशस्वी करून दाखविले आहेत.
संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली व सभासद शेतकरी, ज्ञात अज्ञात सहकारी यांच्या प्रेरणेतून सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्यांचा लौकीक जागतिक पातळीवर उमटविण्यासाठी जाणिवपुर्वक प्रयत्न करू. उपाध्यक्ष रमेश घोडेराव म्हणाले की, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची धुरा कोल्हे कुटूंबियांनी सतत तेवत ठेवत आपल्याला उपाध्यक्षपदाची संधी दिली त्याचे सोने करू, विश्वासराव महाले यांनी आभार मानले.
कमी वयात कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा
जिल्हा बॅंकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या खांद्यावर कोल्हे साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा अत्यंत कमी वयात आली. त्यांनी आतापर्यंत करीत असलेल्या पदाच्या माध्यमातून कामाला न्याय दिला. कोल्हे कुटूंबियांनी कारखान्याच्या इतिहासात प्रथमच अल्पसंख्यांक समाजाला उपाध्यक्षपदाची संधी दिली. त्याबद्दल बिनविरोध निवडणूक झालेल्या कोल्हे सहकारी साखर कारखान्याचीच चर्चा आहे.