कोपरगाव -कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी आमदार आशुतोष काळे तर उपाध्यक्षपदी दिलीपराव बोरनारे यांची बिनविरोध निवड झाली. कारखान्याची निवडणूक नुकतीच झाली असून 21 उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. कारखान्याच्या पदाधिकारी निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक झाली. त्यावेळी पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
अध्यक्षपदाच्या नावाची सूचना राजेंद्र घुमरे यांनी मांडली. यास अनिल कदम यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदाच्या नावाची सूचना सूर्यभान कोळपे यांनी मांडली. त्यास प्रवीण शिंदे यांनी अनुमोदन दिले. निवडीनंतर नवनिर्वाचित अध्यक्ष आ. काळे म्हणाले की, मागील पाच वर्षापासून कारखान्याची जबाबदारी पार पाडत असतांना तोट्यात असणारा कारखाना सभासद व संचालक मंडळाच्या सहकार्याने नफ्यात आणला. जिल्ह्यात ऊसाला एफआरपीपेक्षा जादा दर देण्याची परंपरा कायम ठेवली आहे.
मागील काही वर्षापासून अतिरिक्त ऊसाचा प्रश्न सातत्याने निर्माण होत असल्यामुळे मागील संचालक मंडळाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय घेवून कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने कारखाना विस्तारीकरणाचे काम हाती घेतले असून हे काम युद्धपातळीवर सुरु आहे. त्यामुळे 2022-23 चा गळीत हंगाम हा नवीन बॉयलर व नवीन मिलच्या माध्यमातून सुरु होणार आहे. सहकाराची जपवणूक करतांना सभासद हित डोळ्यासमोर ठेवून माजी खासदार शंकरराव काळे यांच्या आशीर्वादाने कारखान्याच्या प्रगतीसाठी माझी बांधिलकी कायम राहील.
यावेळी ज्येष्ठ संचालक माजी आमदार अशोकराव काळे यांच्यासह नवनिर्वाचित संचालक राजेंद्र घुमरे, सुधाकर रोहोम, वसंतराव आभाळे, सूर्यभान कोळपे, सचिन चांदगुडे, अनिल कदम, श्रीराम राजेभोसले, अशोक मवाळ, शंकरराव चव्हाण, मनोज जगझाप (माळी), शिवाजीराव घुले, सुनील मांजरे, दिनार कुदळे, प्रवीण शिंदे, डॉ. मच्छिंद्रनाथ बर्डे, वत्सलाबाई सुरेश जाधव, इंदुबाई विष्णू शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
माझ्यावर कोपरगाव विधानसभा मतदार संघाची जबाबदारी असून ती जबाबदारी समर्थपणे पार पाडत असतांना पुन्हा एकदा कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची जबाबदारी सभासदांनी व संचालक मंडळाने मोठ्या विश्वासाने दिली आहे. काटकसर करून कारखानदारी चालविली तरच शेतकऱ्यांच्या कष्टातून उभा राहिलेला सहकार टिकेल व शेतकरी समृद्ध होईल अशी माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे यांची उदात्त विचारसरणी होती. ती विचारसरणी डोळ्यासमोर ठेवून माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सभासद हित व कारखान्याबरोबरच उद्योग समुहाची सर्वांगीण प्रगती हा संचालक मंडळाचा मुख्य अजेंडा राहील.
आशुतोष काळे, आमदार, कारखान्याचे अध्यक्ष