पुणे – सदू शिंदे स्मृती करंडक 2020 च्या स्पर्धेत आज आयएलएस लॉ कॉलेजच्या मैदानावर झालेल्या चित्तथरारक सामन्यात व्हेटेरन्स स्पोर्टस संघाने आझाद स्पोर्टस फाउंडेशनवर अवघ्या एका धावेने मात केली. व्हेटेरन्स स्पोर्टसच्या 248 धावांचा पाठलाग करताना आझाद स्पोर्टस फाउंडेशनला 9 बाद 247 धावाच करता आल्या. आझाद स्पोर्टस फाउंडेशनचा चेतन रणदिवे जखमी निवृत्त झाल्याने संघाला डाव सोडून द्यावा लागला.
प्रथम फलंदाजी करताना व्हेटेरन्स स्पोर्टसने 37.3 षटकांत 248 धावांचा डोंगर उभा केला. त्यामध्ये मधल्या फळीतील फलंदाज आनंद मानेच्या 33 चेंडूंतील 43 आणि अनिल परमारच्या 48 चेंडूंतील 61 धावांचा मोठा वाटा राहिला. त्याखालोखाल कैवल्य सुर्वेच्या 32 आणि अमित पाटेकरच्या 31 धावा मोलाच्या ठरल्या. एकूण धावसंख्येत तब्बल 29 अवांतर धावा होत्या. आझाद स्पोर्टस फाउंडेशनच्या पिल्लाईने 37 धावांत 3, तर विजय तारसने 67 धावांत 3 आणि अनिकेत भोसलेने 46 धावांत 2 विकेट्स घेतल्या.
आझाद स्पोर्टस फाउंडेशनने जोरदार प्रत्त्युत्तर देताना, सलामीवीर प्रसाद पलांडेच्या 71 आणि मधल्या फळीतील फलंदाज अनिकेत भोसलेच्या 73 धावांचे मोठे योगदान दिले. त्यानंतर राजू तारसच्या 31 धावा उल्लेखनीय ठरल्या. व्हेटेरन्स स्पोर्टसच्या शेखर गाडवेने 45 धावांत 3 विकेट्स घेतल्या. तर अमित पाटेकर आणि आनंद माने यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतना अनुक्रमे 42 व 72 धावा दिल्या.