प्राणी संग्रहालयाच्या वर्धापनदिनाच्या मुहुर्तावर खंदकात दाखल
– धिरेंद्र गायकवाड
कात्रज – स्व. राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाच्या 21व्या वर्धापन दिनाच्या (दि.14) मुहुर्तावर जंगलाचा राजा दाखल झाला. पवन असे नाव ठेवलेल्या या सिंहाच्या डरकाळीने प्राणी संग्रहालय दणाणून गेले.
मध्य प्रदेशातील कमला नेहरू प्राणी संग्रहालयातून सात महिन्याच्या प्रतीक्षेनंतर नर जातीचा आशियाई सिंह येथे आणण्यात आला. दि. 16 फेब्रुवारीला तो या प्राणी संग्रहालयामध्ये दाखल झाला होता. मात्र, 21 दिवस प्राणिसंग्रहालयातील निरीक्षण गृहामध्ये त्याला ठेवण्यात आले होते. तर, आज (दि.14) प्राणी संग्रहालयाच्या वर्धापन दिनाच्या मुहुर्तावर सकाळी अकराच्या सुमारास संचालक डॉ. राजकुमार जाधव व अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये पर्यटकांना पाहण्यासाठी खंदकामध्ये या सिंहाला सोडण्यात आले.
यावेळी पर्यटकांनी टाळ्या वाजून या राजाचे स्वागत केले. या आशियाई सिंहाचे नाव पवनफ असे ठेवण्यात आले आहे याचे वय चार वर्षे 9 महिने असून वजन सुमारे 175 किलो आहे. सिंहाचे पशुपालक दत्तात्रेय चांदणे व त्यांचे सहकारी त्याच्या खाण्याची व अन्य देखरेख करीत आहेत. या सिंहाला रोज दहा किलोग्राम मास खाण्यास लागते.हा सिंह पूर्णपणे तंदुरुस्त असून दिसण्यास खूप आकर्षक आहे, याच्या गळ्याभोवती असणारे आयाळ काळे व तांबूस रंगाचे असल्याने तो खूपच आकर्षक दिसतो.
प्राणिसंग्रहालयामध्ये सुमारे 63 प्रजातीचे एकूण 400 पक्षी, प्राणी व सर्प आहेत. प्राणी अदलाबदली कार्यक्रमांतर्गत राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील जाळीदार अजगराच्या बदल्यांमध्ये हा सिंह आणण्यात आला आहे.
– डॉ. राजकुमार जाधव, संचालक