मुंबई – मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी एटीएसनंतर आता एनआयएकडून मुंबई पोलीस दलात सहायक पोलीस निरीक्षक म्हणून सेवेत असलेले सचिन वाझे यांचा जबाब नोंदवण्यात आला असताना संभाव्य अटक टाळण्यासाठी न्यायालयात धाव घेणाऱ्या वाझे यांना दिलासा मिळू शकलेला नाही. शनिवारी रात्री वाझेंना अटक करण्यात आली असून आज कोठडी मिळविण्यासाठी वाझेंना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.
NIA arrests Mumbai police officer Sachin Vaze in connection with its investigation into the recovery of explosives from a car parked near Mukesh Ambani’s house in Mumbai https://t.co/6AZvHH6rz2
— ANI (@ANI) March 13, 2021
एएनआय या वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ‘प्रसिद्ध उद्योगपती आणि अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार ही पोलीस अधिकारी सचिन वाझेंनीच ठेवल्याचा संशय एनआयएने व्यक्त केला आहे. एनआयएने सांगितल्यानुसार, सचिन वाझे यांना आईपीसीच्या कलम 286, 465, 473, 506(2), 120 बी आणि 4 (ए)(बी)(आय) स्फोटक वस्तू कलम 1908 अंतर्गत अटक करण्यात आली आहे.
व्हॉट्सऍप स्टेटस्मुळे खळबळ
सचिन वाझे यांनी ठेवलेल्या व्हॉट्सऍप स्टेटस्मध्ये जगाचा निरोप घेण्याची वेळ जवळ आली, असा उल्लेख केल्याने खळबळ उडाली आहे. तीन मार्च 2004. सीआयडीमधील काही जणांनी मला खोट्या आरोपांखाली अटक केली. या अटकेसंदर्भात अजूनही वाद आहे. इतिहासाची पुनरावृत्ती होणार अशी शक्यता आहे. मला पुन्हा एकदा खोट्या आरोपांखाली अडकवण्याची शक्यता आहे. आधी हे घडले तेव्हा माझ्याकडे 17 वर्षांचा कालावधी होता. आशा होती, धैर्य होते, आयुष्य आणि नोकरीमधील अनेक वर्षे शिल्लक होती. मात्र, आता माझ्याकडे आयुष्याची पुढील 17 वर्षे शिल्लक नाहीत. तसेच नोकरीची एवढी वर्षे आणि अशा पद्धतीने जगण्याचे धैर्यही नाही. मला वाटतं जगाचा निरोप घेण्याची वेळ जवळ आली, असे या स्टेटस्मध्ये म्हटले आहे.