पुणे -स्पोर्टसफिल्ड मॅनेजमेंटतर्फे आयोजित दुसऱ्या एस. बालन करंडक अजिंक्यपद टी-20 क्रिकेट स्पर्धेत पुनित बालन ग्रुप आणि द गेम चेंजर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून स्पर्धेत विजयी सलामी दिली.
मुंढवा येथील लिजंडस् स्पोर्टस क्लब मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत श्रीधर बारोट याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर पुनित बालन संघाने पीआयओसी हरिकेन्स संघाचा 25 धावांनी पराभव केला. पुनित बालन संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकांत 9 गडी गमावून 154 धावांचे आव्हान उभे केले. ऋषभ राठोड याने 48 धावांची खेळी करून धावसंख्येमध्ये मोलाचा वाटा उचलला.
याबरोबरच हृषिकेश मोटकर (28 धावा) व शुभम रांजणे (15) यांनीही हातभार लावला. या आव्हानाचा पाठलाग करताना पीआयओसी हरिकेन्स संघाचा डाव 20 षटकांत 9 गडी गमावून 129 धावांवर मर्यादित राहिला. हरिकेन्सच्या जयवीर नदाल (26 धावा), क्षितिज कबीर (20), ऋतुराज वीरकर (19) यांची खेळी संघाचा पराभव टाळू शकली नाही. बालन संघाच्या श्रीधर बारोट याने 23 धावात 4 गडी टिपले आणि संघाचा विजय सोपा केला.
दुसऱ्या सामन्यात कर्णधार नौशाद शेखच्या 50 धावांच्या जोरावर गेम चेंजर्स संघाने पुनित बालन ग्रुपचा 4 गडी राखून सहज पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना पुनित बालन संघाने 20 षटकांत 9 गडी गमावून 101 धावा केल्या. बालन संघाचा डाव स्थिरावलाच नाही आणि त्यामुळे त्यांना केवळ 100 धावांचा टप्पा गाठता आला. हृषिकेश मोटकर (20) व दिलीप मालविया (20) यांनी सर्वाधिक धावा केल्या. हे आव्हान गेम चेंजर्स संघाने 14.4 षटकांत व 6 गडी गमावून पूर्ण केले. नौशाद शेखने 37 चेंडूत 6 चौकार व 1 षटकारांसह 50 धावा करून संघाला विजय मिळवून दिला.
संक्षिप्त धावफलक –
1) पुनित बालन ग्रुप ः 20 षटकांत 9 बाद 154 धावा. (ऋषभ राठोड 48, हृषिकेश मोटकर 28, शुभम रांजणे 15, प्रतीक दोशी 2-25, क्षितिज कबीर 2-24) वि. वि. पीआयओसी हरिकेन्स ः 20 षटकांत 9 बाद 129 धावा. (जयवीर नदाल 26, क्षितिज कबीर 20, ऋतुराज वीरकर 19, नीरज मोरे 18, श्रीधर बारोट 4-23, पुनित बालन 2-34). सामनावीर – श्रीधर बारोट.
2) पुनित बालन ग्रुप ः 20 षटकांत 9 बाद 101 धावा (हृषिकेश मोटकर 20, दिलीप मालविया 20, अक्षय जाधव नाबाद 18, आशय पालकर 2-8, शुभम मेद 2-17) पराभूत वि. गेम चेंजर्स ः 14.4 षटकांत 6 बाद 104 धावा. (नौशाद शेख 50, अतिफ सय्यद 21, शुभम रांजणे 4-28, अक्षय जाधव 2-10). सामनावीर – नौशाद शेख.