रशियाने संपूर्ण सैन्यबळासह युक्रेनवर हल्ला केला आहे. ब्रिटन आणि अमेरिका या हल्ल्याच्या गंभीर परिणामांचा इशारा देत आहेत. परंतु या हल्ल्यासाठी आंतरराष्ट्रीय निषेध आणि निर्बंधांकडे दुर्लक्ष करून, रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी इतर देशांना इशारा दिला आहे. रशियन कारवाईमध्ये हस्तक्षेप करण्याचा कोणताही प्रयत्न केल्यास “यापूर्वी कधीही पाहिले नाही असे परिणाम होतील.” असा इशारा पुतिन यांनी दिलाय. पुतिन थेट नाटोला आणि अमेरिकेला इशारा देत आहेत की, युक्रेनवरील रशियन हल्ल्यात हस्तक्षेप केल्यास त्यांना भयंकर परिणाम भोगावे लागतील.
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, रशियन लष्कर युक्रेनच्या महत्त्वाच्या लष्करी तळांना लक्ष्य बनवत आहेत. युक्रेनची पायाभूत सुविधा, हवाई संरक्षण सुविधा, लष्करी हवाई क्षेत्रे रशियाच्या निशाण्यावर आहेत. गुरुवारी सकाळी पुतीन यांनी पूर्व युक्रेनमध्ये लष्करी कारवाईचे आदेश दिले. रशियन सैन्याने क्रिमियामार्गे युक्रेनमध्ये प्रवेश करण्यास सुरुवात केली.
त्याचवेळी रशियाच्या या आदेशावर अमेरिकेने जोरदार टीका केली आहे. रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याबाबत अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन म्हणाले की, हा हल्ला पूर्णपणे विसंगत आणि भडकावणारा आहे. बुधवारीच युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की म्हणाले होते की, रशिया युक्रेनवर कधीही हल्ला करू शकतो. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ट्विट केले आहे की, “युक्रेनमधील भीषण घडामोडी पाहून धक्का बसला आहे आणि मी (युक्रेनचे) राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी पुढील पावले उचलण्याची चर्चा केली आहे… ”
तर युक्रेनने भारतासह जगातील अनेक देशांना या कठीण काळात युक्रेनला पाठिंबा देण्याचे आणि रशियाचे अध्यक्ष पुतिन यांना समजावण्याचे आवाहन केले आहे. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी जागतिक नेत्यांना संरक्षण सहाय्य देण्याचे आणि युक्रेनच्या हवाई क्षेत्राचे रक्षण करण्यास मदत करण्याचे आवाहन केले आहे.