बंगळुरू – रशिया-युक्रेन युद्धादरम्यान युक्रेनच्या खार्किव्ह शहरामध्ये मृत्युमुखी पडलेल्या नवीन ज्ञानगौडा यांचा मृदेह सोमवारी भारतात परत येणार असल्याचे त्याच्या कुटुंबियांना कळविण्यात आले आहे. त्याच्या कुटुंबियांनी घरात पूजा घालून हा मृतदेह वैद्यकीय महाविद्यालयाला दान करण्याचा निर्णय घेतला आहे.
युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धामध्ये नवीनचा दोन आठवड्यांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यानंतर युद्धभूमीवरुन नवीनचे पार्थिव भारतात आणण्यासाठी भारतीय परराष्ट्र मंत्रालय तसेच युक्रेनमधील भारतीय दूतावास यांच्याकडून प्रयत्न सुरु होते.
नवीनच्या मृत्यूची बातमी आल्यापासून त्याचे कुटुंबीय नवीनच्या पार्थिवाची पाट पाहत आहेत. नवीनला शेवटचे एकदा पाहता येणार हे समजल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी नवीनचे पार्थिव वैद्यकीय महाविद्यालया देण्याचा निर्णय घेतला आहे. नवीनचे पार्थिव एस.एस. इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स ऍण्ड रिसर्च सेंटरला या वैद्यकीय महाविद्यालयाला दिले जाणार आहे.
“”आम्ही आमच्या मुलाचा चेहरा पाहू शकू की नाही, असा प्रश्न आम्हाला पडला होता. मात्र राज्य आणि केंद्र सरकारच्या प्रयत्नामुळे आम्हाला मुलाला पाहता येणार आहे. आम्ही नवीनच्या पार्थिवाची पूजाअर्चा करु. त्यानंतर नवीनचा मृतदेह आम्ही वैद्यकीय महाविद्यालयाला दान करु,” असे नवीनचे वडील शेखरप्पा यांनी सांगितले आहे.