बर्लिन – रशियाविरोधात सुरू असलेल्या युद्धाची मदत म्हणून युक्रेनला लांब पल्ल्याची तौरस क्षेपणास्त्रे देण्यास जर्मनीने नकार दिला आहे. युक्रेनला ही क्षेपणास्त्रे देण्यात यावीत, अशी मागणी जर्मन विरोधकांनी संसदेत एका प्रस्तावाद्वारे केली होती.
मात्र संसदेत झालेल्या मतदानाच्यावेळी हा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. एक दिवस आगोदरच जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शुल्झ यांनी युक्रेनला शस्त्रे न देण्याच्या आपल्या निर्णयाचा पुनरुच्चार केला होता.
जर्मनीतील मध्यममार्गा- उजव्या विचारसरणीच्या युनियन ब्लॉक या मुख्य विरोधी पक्षाने युक्रेनला तौरस क्षेपणास्त्रे देण्याचा प्रस्ताव मांडला होता. या मुद्यावरून शुल्झ यांच्या नेतृत्वाखालील ३ पक्षांच्या आघाडी सरकारमध्ये मतभेद होतील, अशी विरोधकांची अपेक्षा होती.
मात्र संसदेच्या कनिष्ठ सभागृहामध्ये या प्रस्तावावर झालेल्या मतदानामध्ये प्रस्तावाच्या विरोधात ४९५ आणि प्रस्तावाच्या बाजूने १९० मते पडली. त्यामुळे हा प्रस्ताव फेटाळला गेला. अमेरिकेपाठोपाठ जर्मनी हा युक्रेनला सर्वाधिक शस्त्र पुरवठा करणारा देश ठरला आहे.
युक्रेनने ५०० किलोमीटरपर्यंत मारा करू शकणारी तौरस क्षेपणास्त्रे जर्मनीकडे मागितली होती. मात्र शुल्झ यांनी त्याला नकार दिला आहे. ही क्षेपणास्त्रे रशियाच्या आत खोलपर्यंत मारा करण्यासाठी वापरली जाऊ शकतील, अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे.