पारनेर -चोवीस तास मोबाईल आमदार म्हणून ओळखत असलेल्या आमदार नीलेश लंके यांनी तालुक्यात अडचणी व समस्येने त्रासलेल्यांना तातडीने मदतीचा हात दिली. त्यात रुग्णांना आवश्यक ते उपचार व सेवा देतांना आर्थिक मदत देखील त्यांनी मिळवून दिली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून गेल्या दहा महिन्यात त्यांनी तब्बल 50 लाख रुपये मदत रुग्णांच्या नातेवाईकांना मिळवून दिली आहे.
राज्यातील 288 मतदारसंघातील आमदारांमध्ये आ. लंके हे मदत मिळवून देण्यात अव्वल ठरले आहे. गेल्या दहा महिन्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून राज्यातील आठ हजारांहून अधिक रुग्णांना 60 कोटी 48 लाख रुपयांची मदत झाली असून त्यापैकी 50 लाख रुपयांची मदत एकट्या आ. निलेश लंके यांनी विविध रुग्णांना मिळवून देत राज्यात प्रथम क्रमांक पटकविला. वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी ही माहीती दिली.
राज्यातील दारिद्रय रेषेखालील रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून 60 टक्क्यांपर्यंत मदत केली जाते. आमदार नीलेश लंके हे राज्यभर दौरे करीत असताना त्यांच्याकडे अनेक रुग्णांचे नातेवाईक वैद्यकीय खर्चासाठी मदत मिळवून देण्याची मागणी करतात. आ. लंके हे अशा प्रत्येक व्यक्तीची दखल घेऊन मुख्यमंत्री सहाय्यता निधीबरोबरच इतर सेवाभावी संस्थांकडूनही मदत मिळवून देत असतात. आजवर त्यांच्या विधानसभा सदस्यपदाच्या कारकिर्दीत त्यांनी हजारो रुग्णांना मदतीचा हात दिला.
करोना काळात आ.लंके यांनी केलेल्या अव्दितीय कामगिरीमुळे त्यांची वेगळी प्रतिमा राज्यात, देशात निर्माण झाली आहे. त्यामुळे रुग्णांचे नातलग आ. लंके यांच्याशी संपर्क करतात व आ. लंकेही त्यांना सकारात्मक प्रतिसाद देत शक्य होईल तितकी मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करतात.
“रुग्ण सेवाही खरी ईश्वर सेवा आहे. पैशाअभावी रुग्णांवरील उपचार थांबू नयेत, यासाठी सदैव दक्ष असतो. मुख्यमंत्री सहाय्यता निधी अथवा इतर सेवा भावी संस्थांकडून मदत मिळविण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता करताना अडचण निर्माण होऊ नये, यासाठी आपल्या संपर्क कार्यालयात या कामासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. हे कर्मचारी मुख्यमंत्री सहाय्यता निधी तसेच इतर सेवा भावी संस्थांच्या नियमित संपर्कात असतात.त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मदत मिळवून देणे मला शक्य होते”, असे आमदार निलेश लंके म्हणाले.