पुणे -राष्ट्रीय राज्य मार्ग प्राधिकरण (एनएचएआय)ने तयार केलेला नवा कोरा रस्ता महापालिकेने कोणतीही कल्पना न देता खोदला. याबाबत विचारणा केली असता पाण्याच्या व्हॉल्वसाठी रस्ता खोदावा लागला असून रस्ता पुन्हा आहे तसा चकाचक करून देण्यात येईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र, काम झाल्यानंतर “सरकारी काम ते…’ नेहमीप्रमाणे खड्डा भरून डांबराचा पॅच मारण्यात आला आहे,
त्यामुळे नव्या कोऱ्या रस्त्यावर चढ झाला आहे. पहिल्याच पावसात मारलेला पॅच निघणार अशा दर्जाचा केला असल्याचे स्पष्ट दिसते, त्यामुळे अशा कामाबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
डावी भुसारी कॉलनीतील लोहिया आयटी जैन पार्ककडून वारजेकडे जाणाऱ्या सर्व्हिस रस्त्याचे काम पूर्ण होण्यापूर्वी एनएचएआयने महापालिकेला या रस्त्यावरील पाण्याची, ड्रेनेजलाइन अथवा अन्य काही कामे तर करून घ्यावीत, असे सुचविले होते. त्यानंतर एक ते दीड महिना मूदत दिल्यानंतर “आमचे सर्व काम झाले असल्याचे’, महापालिकेने सांगितल्यावर एनएचएआयने डांबरीकरण करून रस्ता चकाचक केला. पांढरे पट्टे मारण्यात आले, दुभाजक तयार केला.
मात्र, नेहमीप्रमाणे महापालिकेने दोन महिन्यांनंतर हाच रस्ता पाण्याच्या लाईनसाठी खोदला. यावेळी गोंधळावर पडदा टाकण्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांनी “आम्ही रस्ता पूर्ववत तयार करून देतो,’ असे सांगून वेळ मारून नेली.
परंतु, पालिका रस्ता जसा होता तसा करणार की केवळ पॅच मारणार, अशी शक्यता व्यक्त केली जात होती, याबाबत “प्रभात’नेही वृत्त प्रसिद्ध केले. ती शक्यता खरी ठरली.
“पॅच’ उखडणार….
महापालिकेने खड्डा भरून त्यावर डांबरीकरण केले असले तरी बाजूचा रस्ता नवा कोरा आणि पालिकेने मारलेला पॅच हे विचित्र दिसत आहे. हा पॅच पाहून तो पावसाळ्यात उखडण्याची अधिक शक्यता असून पालिकेने चांगला रस्ता खराब केल्याचे एनएचएआयच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. दरम्यान, येथील रस्त्यावरील बारीक खडीमुळे वाहने स्लीप होण्याचा धोका आहे. खोदकामातील काही राडारोडा बाजूच्या फुटपाथवर जैसे थे आहे.