नगर – लोकसभा निवडणुकीत मतदान केंद्रावर गोंधळ घालणाऱ्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जाणार आहे. त्यानुसार संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे. गोंधळ घालणाऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी जिल्ह्यात सूक्ष्म निरीक्षक नियुक्त केले जाणार आहेत. अहमदनगर आणि शिर्डी मतदार संघासाठी सुक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे.
जिल्ह्यातील ३८६ सुक्ष्म निरीक्षकांना न्यू आर्टस् महाविद्यालयाच्या राजर्षी शाहू महाराज सभागृहात प्रशिक्षण देण्यात आले. महसूल उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी शाहूराज मोरे, नोडल अधिकारी अजित नवले, सहायक नोडल अधिकारी सुनील नरसाळे आदी उपस्थित होते.
शाहूराज मोरे म्हणाले की, लोकसभा निवडणूक ही निर्भय आणि पारदर्शी वातावरणात झाली पाहिजे. मतदान केंद्राच्या शंभर मीटर अंतरामध्ये निवडणूक प्रक्रियेतील अधिकारी-कर्मचारी, उमेदवारांचे प्रतिनिधी आणि मतदारांनाच प्रवेश राहणार आहे. या अंतरात अन्य कोणालाही प्रवेश करता येणार नाही. या क्षेत्रात गोंधळ घातल्यास संबंधित केंद्रावरील कर्मचाऱ्यांवरही कारवाई केली जाईल. सुक्ष्म निरीक्षकांना मतदान केंद्र परिसरातील फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येईल. फोटो आणि रेकॉर्डिंगचा वापर कायदेशीर कारवाईसाठी होणार आहे. गोंधळ घालणाऱ्यावर कारवाईसाठी हा महत्त्वाचा पुरावा ठरेल. हे फोटो आणि रेकॉर्डिंग कोणत्याही परिस्थितीमध्ये कोठेही व्हायरल करायचे नाही; अन्यथा तुमच्यावर निवडणूक आयोग कारवाई करेल.
उपजिल्हाधिकारी चोरमारे म्हणाले की, केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीसाठी यावेळी प्रथमच घरातून मतदानाची सुविधा ८५ वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांना उपलब्ध करून दिली आहे. कोणत्या मतदान केंद्राच्या हद्दीत कोणत्या दिवशी घरून मतदान करण्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे. याबाबत वेळेपत्रक ठरविले जाणार आहे. या वेळापत्रकाची माहिती उमेदवारांना ही दिली जाणार आहे. उमेदवारांचे प्रतिनिधी स्थानिक पातळीवर उपस्थित राहू शकतील. घरातून मतदान ही प्रक्रियेत मतदाराचे मतदान हे मतदान केंद्राप्रमाणेच गोपनीय पद्धतीने घेतले जाणार आहे. या प्रक्रियेतही सुक्ष्म निरीक्षकांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे.
हे आहेत सुक्ष्म निरीक्षक
राष्ट्रीयीकृत बँका, भारतीय आयुर्विमा महामंडळ आदी शासनाच्या अंगिकृत सार्वजनिक उपक्रमातील अधिकाऱ्यांची सुक्ष्म निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. कोणाकडे कोणत्या मतदार संघाची जबाबदारी आहे. हे मतदानाच्या एक दिवस अगोदर नियुक्तीपत्राच्या वेळेस समजणार आहे.
४४ अधिकारी गैरहजर
सुक्ष्म निरीक्षकाच्या कर्तव्याची जाणीव होण्यासाठी आयोजित प्रशिक्षणासाठी ३८६ अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली होती. प्रत्यक्षात ३४२ अधिकारी हजर होते. या प्रशिक्षणाला ४४ अधिकारी गैरहजर होते.