पुणे – खराडी चौक ते शिक्रापूरपर्यंत नगर महामार्गावरील वाहतूक कोंडीसह अन्य समस्या कायमच असल्याने पुणे-नगर रस्त्याची पाहणी करून महिनाभरानंतरही “आरटीओ’कडून अहवाल तयार करण्यात आला की नाही, याबाबत शंका आहे. याबाबत संबंधीत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन उपाययोजनांबाबत पुन्हा मागणी करणार आहे. समाधानकारक कार्यवाही झाली नाही तर नगर महामार्गांव चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे, असा इशारा माजी आमदार बाजूसाहेब पठारे यांनी दिला आहे.
एप्रिल महिन्यांत “आरटीओ’चे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत भोसले, “पीडब्ल्यूडी’चे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई यांच्यासह अधिकारी, अभियंते यांच्या पथकाने नगर रस्त्यावरील खराडी चौक ते घोडनदी पूल दरम्यानच्या भागाची पाहणी केली होती. याचा अहवाल “आरटीओ’कडून दहा दिवसांत करण्यात येणार होता. त्यानुसार “पीडब्ल्यूडी’कडून या महामार्गावर कामे केली जाणार होती. परंतु, महिनाभरानंतरही नगर महामार्गावरील समस्यांवरील उपाययोजनांबाबतचा अहवाल तयार झाला की नाही? अशी शंका व्यक्त करीत माजी आमदार पठारे यांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे.
अपघाती “बॉटल नेक’…
पुणे-शिक्रापूर या दरम्यान रस्त्याचे रूंदीकरण झाले असल्याने वाहनांचा वेग वाढलेला आहे. परंतु, या महामार्गावरही गावांच्या ठिकाणी “बॉटल नेक’ असल्याने (अरूंद रस्ता) अशा ठिकाणी अपघातांचे प्रमाण अधिक आहे. यामध्ये चंदनगर, खराडी, वाघोली, सणसवाडी, शिक्रापूर, रांजणगाव, कोरेगाव भीमा या ठिकाणी अपघाती “बॉटल नेक’ आहेत.
पुणे-नगर रस्त्याचे एकत्रित सर्वेक्षण आरटीओ व पीडब्ल्यूडीच्या अधिकऱ्यांनी केले आहे, याचा अहवाल करण्याचे काम पूर्ण होत आहे. काही उपाययोजना तत्काळ केल्या जातील. सुरक्षित वाहतुकीसाठी आवश्यक त्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. – संजीव भोर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी
नगर महामार्गावरील वाहतूक कोंडीसह अपघाती ठिकाणांवरील सुरक्षा व्यवस्थेबाबत सातत्याने संबंधीत प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. याच कारणातून अधिकाऱ्यांनी या मार्गाची पाहणी करून अहवाल तसेच उपयायोजनांचे काम हाती घेतले आहे. मात्र, त्याला वेग नाही. याबाबत संबंधीत अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे.
– बापूसाहेब पठारे,माजी आमदार, वडगावशेरी