“बाहुबली’मुळे प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेले दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांच्या आगामी “आरआरआर’ची प्रतीक्षा सर्व प्रेक्षकांना आहे. काही दिवसांपूर्वीच “आरआरआर’चे पोस्टर रिलीज झाले आहे. तेव्हापासूनच हा सिनेमा कधी रिलीज होणार याची प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे.
याचदरम्यान “आरआरआर’च्या पोस्ट रिलीज हक्कांच्या विक्रीबाबतची एक मोठी बातमी समजली आहे. या हक्कांच्या बदल्यात मिळालेली रक्कम ऐकली तर गरगरायला लागेल.
“आरआरआर’च्या हिंदी सिनेमाला थिएटरमध्ये रिलीज करण्याचे हक्क तब्बल 140 कोटी रुपयांना विकले गेले आहेत. संपूर्ण व्यवहार यापेक्षाही अधिक रकमेचा आहे.
तसेच सर्व भाषांमधील “आरआरआर’च्या सॅटेलाइट आणि डिजिटल ब्रॉडकास्टिंगच्या अधिकारांची किंमत मिळून निर्मात्यांना तब्बल 325 कोटी रुपये मिळाले आहेत. हा सौदा आतापर्यंतच्या सिनेविश्वातील ब्रॉडकास्ट हक्कांबाबतचा सर्वात मोठा सौदा ठरला आहे.
या सिनेमाचे हक्क जरी झी ग्रुपने खरेदी केले असले. तरी हे हक्क विकत घेण्यासाठी स्टार ग्रुपकडूनही हालचाली सुरू आहेत. मात्र, हे हक्क रिलीजनंतरच्या स्ट्रीमिंग राईटस संदर्भात असल्याचे समजले आहे.
हक्कांबाबतच्या या व्यवहारांवर निर्मात्यांकडून अद्याप अंतिम शिक्कामोर्तब केले गेलेले नाही. तेलगू इंडस्ट्रीतील ज्युनिअर एनटीआर आणि राम चरण हे दोघेही पहिल्यांदाच “आरआरआर’मध्ये एकत्र दिसणार आहेत.