झुमका गिरा रे… “मेरा साया’ या सिनेमात अभिनेत्री साधनावर चित्रित करण्यात आलेले हे गाणे सध्या, “व्हाट झुमका’? या नव्या स्वरूपात तरुणांच्या वर्तुळात गाजत आहे. एकोणीसशे सहासष्ट सालच्या या सिनेमातील हे गाणे राजा मेहंदीअली खान यांनी लिहले तर याला स्वरसाज चढविले ते मदन मोहन यांनी. हे वर्ष मदन मोहन यांचे जन्म शताब्दी वर्ष ही आहे.
रसिकाच्या मनात ओढ निर्माण करणाऱ्या या गीताचा इतिहास ही बऱ्यापैकी रोचक आहे. कारण “मेरा साया’ सिनेमाच्या कथानकात बरेली नाही आणि बरेली झुमक्यासाठी प्रसिद्धही नाही किंबहुना बरेली प्रसिद्ध आहे ती सुरम्यासाठी.
बरं हा झुमका, हैद्राबादच्या बेगम बाजार, दिल्लीच्या मीनाबाजार किंवा इंदूरच्या सराफबाजारात का पडला नाही? त्याने बरेलीतच का पडावे? तर याचा थेट संबंध आहे महानायक अमिताभ बच्चनचे वडील हरिवंशराय आणि तेजी बच्चन, तसेच गीतकार राजा मेहंदीअली खान यांच्याशी.
एकोणीसशे एक्केचाळीसचा तो काळ. पत्नी श्यामा व वडील यांच्या थोड्या फार काळफरकाने झालेल्या मृत्यूने उदास हरिवंशराय बच्चन यांचे काहीशा विमनस्क अवस्थेत बरेलीमधे येणे झाले. बरेली महाविद्यालयात त्यांची नोकरी लागली होती. आपले घनिष्ठ ज्योतीप्रकाश यांच्याकडे ते पाहुणे म्हणून मुक्कामी होते. त्याच वेळी ज्योतीप्रकाश यांच्याकडे तेजी सुरी याही पाहुण्या म्हणून होत्या. लाहौरच्या तेजी मनोविज्ञानच्या प्राध्यापिका. तेजींचा विदेशात असलेल्या एका मुलाशी नुकताच साखरपुडा ठरला होता, पण या संबंधाने त्या नाखूश होत्या. त्यांच्या मुख्याध्यापिका प्रेमा जोहरी, तेजीचे सल समजून होत्या. दोघे एकाच घरात असल्याने त्यांच्या साधारण परिचयाचे रूपांतर एकमेकांना पसंत करू लागणेपर्यंत येऊन ठेपले.
नाताळचे ते दिवस, एकतीस डिसेंबर साजरी करून ही सारी मंडळी घरी परतली तेव्हा ज्योतीप्रकाश यांनी बच्चनजींना कविता सादर करण्यास सांगितले. बच्चनजींनी त्यांची “उस नयन में बह सकी कब, इस नयन की अश्रुधारा’! ही कविता ऐकवली, कविता ऐकता ऐकता तेजीच्या डोळ्यातून अश्रूचे पाट वाहू लागले. बच्चनही भाव विव्हळ झाले. सामाजिक बंधन गळून दोघे ही आलिंगनबद्ध झाली. तेजी, बच्चनपासून विलग होत असता त्यांचा “झुमका’ बच्चन यांच्या कुर्त्यात अडकला. ही बाब राजा मेहंदीअली खान यांनी हेरली. प्रेमाचे पती प्रकाश जोहरी यांनी स्थिती समजत दोघांच्या साखरपुड्याची घोषणा करून टाकली.
दोघेही आपापल्या गावी निघून गेली. पुढे एका समारोहात तेजींना राजा मेहंदीअली खान यांनी लग्न कधी करताय असे विचारले, तेव्हा त्या मिस्कीलपणे म्हणाल्या, “आप ही तजवीज करो, मेरा झुमका तो बरेली में ही गिर गया.’ या ओळीचा अर्थ काहीही असो पण ही ओळ; खान यांच्या मनात घर करून गेली. तब्बल पंचवीस वर्षांनंतर “मेरा साया’ सिनेमासाठी गाणे लिहिण्याचे ठरले तेव्हा दृश्याच्या मागणीवरून या प्रेम प्रकरणाच्या आठवणीने उचल खाल्ली आणि हरिवंश व तेजी यांच्या प्रेमप्रसंगात घडलेल्या किश्शयांना पद्य करून राजा मेहंदीअली ख़ान यांनी ओळी लिहल्या.
घर के छत पर मैं खडी, गली में दिलबर जानी,
हॅंसकर बोले नीचे आ, अब नीचे आ दीवानी.
तसेच
सैंया आये नैन चुराये घर में चोरी चोरी,
बोले झुमका मैं पहना दूँ आजा बॉंकी छोरी.
या त्यावेळी घडलेल्या गोष्टी होत्या. झुमका गिरा रे… कमालीचा लोकप्रिय ठरला. आज सत्तावन्न वर्षांनंतर ही हे गाणे रसिकांच्या कानी व ओठी रेंगाळत आहे. तेजींच्या या पडलेल्या झुमक्याच्या आठवणी बरेलीकरांनीही सांभाळून ठेवल्या. स्थानिक बोली भाषेत आज ही उपवर मुली एकमेकींना लग्नासाठी चिडवताना, तेरा झुमका कब गिरेगा? अशी पृच्छा करतात.
बरेली प्रशासनाने बरेली दिल्ली महामार्गावर चौदा मीटर उंचीचा झुमका लावून या गाण्याचे अस्तित्व जपले आहे. या जागेला “झुमका तिराहा’ या नावाने ओळखले जाते. झुमका तेजी सुरी-बच्चनचा होता पण साधना कटप्रमाणे साधनाचा बरेली झुमकाही अमर झाला.
– सत्येंद्र राठी