rohit pawar – अजित पवार ( ajit pawar ) गटातील आमदारांविरोधात भाजप अपक्ष उमेदवार उभे करणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार ( rohit pawar ) यांनी म्हटले आहे. त्या अपक्ष उमेदवारांना भाजप ताकद देत अजित पवार ( ajit pawar ) गटातील आमदारांना पराभूत करण्याचे काम करणार आहे. ही गोष्ट माहिती असल्याने अजित पवार गटातील आमदारांमध्ये चल-बिचल सुरू झाली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
रोहित पवार म्हणाले की, छगन भुजबळ आता देवेंद्र फडणवीसांची भाषा बोलत आहेत. जानेवारी महिन्यात राजकारण जातीवर जाण्याची भीती आम्हाला वाटत आहे. लोकसभा निवडणुकीआधी ओबीसी-मराठा वाद सुरु झाला आहे. हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, त्यातून राजकीय पोळी भाजता आली नाही, म्हणून मराठा-ओबीसी वाद लावण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात येत आहे.
देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना लिहिलेले खासगी पत्र माध्यमांकडे आले. मात्र, फडणवीसांना ते पत्र बाहेर आणायचेच होते. त्या पत्रामुळे अजित पवारांची कोंडी झाली आहे. आमदार नवाब मलिक यांच्याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लिहिण्यात आलेल्या पत्राबाबतही रोहित पवारांनी भाष्य केले आहे.
प्रकाश आंबेडकरांना सल्ला
एमआयएम पक्ष हा भाजपकडून पैसे घेऊन निवडणुकीत आपले उमेदवार उभे करतो. तसेच, महाविकास आघाडीचे उमेदवार पाडण्यास एमआयएम भाजपला मदत करतो असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये रोहित पवारांनी हा आरोप केल्याने राज्यात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तसेच, प्रकाश आंबेडकर हे संविधान वाचवण्याची भाषा करतात, २०१९ मध्ये वंचित आघाडीने उमेदवार उभे केल्याने आमचे अनेक उमेदवार पडले. आमचा पण संविधान वाचवण्याचा उद्देश आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी खबरदारी घ्यावी, असा सल्ला त्यांनी आंबेडकर यांना दिला.