वालचंदनगर परिसरात अवैध धंद्यांना ऊत : पालकांतून चिंता उमटली
वालचंदनगर -वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात दारू, गुटखा, जुगार व मटका आदी अवैध धंद्यांना ऊत आला आहे. शाळेच्या परिसरात आणि बसस्थानकावर रोडरोमिओंनी उच्छाद मांडला आहे. वालचंदनगर पोलिसांनी याबाबत वेळीच पावले उचलावीत, अशी मागणी वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांनी केली आहे.
वालचंदनगर येथील बाजारतळावर तर ठिकठिकाणी मटकाकिंग दिसत आहेत. आठ दिवसांतून दोनवेळा वालचंदनगर येथे भरलेल्या बाजारात कोणालाही न जुमानता मटक्याच्या पावत्या फाडताना दिसत आहेत.
ठिकठिकाणी अवैधरित्या देशी व गावठी दारूची विक्री सर्रासपणे होत असताना दिसत आहे. वालचंदनगर येथील वर्धमान विद्यालयातील बीसीए शाळेमधील विद्यार्थिनी शाळेत जात व येत असतात. रोडरोमिओंच्या टोळ्या दुचाकी गाडीवर थांबलेली दिसत असतात.
कळंब येथील वालचंद विद्यालय, फडतरे नॉलेज सिटीमधील विद्यार्थी शाळेबाहेर आले की, गावगुंडांचा घोळका चौकात बसस्थानकावर दिसत आहे. विद्यार्थिनी व पालक वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वालचंदनगर पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन रोडरोमिओंच्या मुसक्या आवळून अवैध धंद्याला आळा घालावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.