नगर – नगर शहरासाठी प्रतीदिन 700 थाळ्यांची मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे नगरला दररोज शिवभोजन थाळीपोटी 28 हजार रुपयांचे अनुदान हे सरकारकडून प्राप्त होणार आहे. त्यानुसार नगरसाठी पहिल्या टप्प्यात 25 लाख 20 हजार रुपयांचे अनुदान जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहे. शिवभोजन योजना सुरू झाल्यानंतर नियमानुसार या अनुदानाचे वाटप करण्यात येणार आहे. रविवारी,दि.26 प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते या योजनेचा प्रारंभ होत आहे.
शहरी भागात शिवभोजन थाळीची किंमत 50 रुपये असणार आहे. पण ग्राहकाला मात्र केवळ दहा रुपयात द्यावी लागणार आहे. ग्राहकाकडून प्राप्त झालेल्या 10 रुपयांव्यतिरिक्त उर्वरीत रक्कम अनुदान म्हणून संबंधित भोजनालय चालवणाऱ्यांना दिले जाणार आहेत.
शिवभोजन योजना सुरू करण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या सेंटरवर सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत. ही योजना चालवताना सरकारने ठरवून दिलेल्या अटी व नियमांचे काटेकोर पालन करावे,फ असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले आहेत. शिवसेनेने प्रचारात घोषणा केल्यानुसार महाविकास आघाडी सरकारने गरिबांसाठी शिवभोजन योजना सुरू केली आहे. राज्य मंत्रिमंडळाने शिवभोजन योजनेला मंजुरी दिली असून याबाबतचे परिपत्रकदेखील नववर्षाच्या पहिल्याच दिवशी काढले आहे.
शिवभोजन सेंटरमध्ये एकाचवेळी गर्दी होणार नाही, यादृष्टीने नियोजन करण्यात यावे. सेंटरमध्ये कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये, यासाठी सीसीटीव्ही लावण्यात यावेत. त्यामुळे सेंटरमध्ये कोण येतात, कोण जातात यावर लक्ष ठेवणे सोपे होईल. ही योजना चालवताना ज्या अटी व नियम ठरवून दिले आहेत, त्याचे काटेकोर पालन करण्यात यावे. याशिवाय जेथे भोजन तयार करण्यात येणार आहे, त्याठिकाणी स्वच्छता ठेवणे महत्त्वाचे आहे. भोजन तयार करण्यासाठी व भोजनासाठी येणाऱ्या ग्राहकांना पिण्यासाठी दिले जाणारे पाणी हे शुद्ध ठेवावे.
भोजनासाठी येणाऱ्यांची नोंदणी
शिवभोजन योजनेसाठी निश्चित करण्यात आलेल्या शहरातील पाचही सेंटरमध्ये दहा रुपयांमध्ये जेवण देण्यात येणार आहे. या थाळीमध्ये दोन चपाती, एक वाटी भाजी, एक वाटी भात, एक वाटी वरण असणार आहे. दुपारी बारा ते दोन यावेळेत ही थाळी मिळणार आहे. ही थाळी खाण्यासाठी येणाऱ्यांची नोंदणी केली जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक सेंटरच्या चालकाला एक मोबाइल ऍप देण्यात आले आहे. या ऍपमध्ये थाळीचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीचे नाव व फोटो घेतला जाणार आहे.