कराड – पुणे- बंगळुरू महामार्गावर खोडशी (ता. कराड) गावच्या हद्दीत मंगळवारी रात्री 8.10 वाजण्याच्या सुमारासहॉटेल पद्मासमोर कारने रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षाचालक जाकीर महमद शेख (वय 50, रा. गोटे ता. कराड) ठार झाला.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, जाकीर शेख रिक्षा (एमएच 50 एम 0242) घेऊन कराडच्या दिशेने जात होते. खोडशी हद्दीत रिक्षाला पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या कारने ( एमएच 12 एनजे 1010) जोरदार धडक दिली.
यामुळे रिक्षा उडून महामार्गाच्या कडेला खड्ड्यात जाऊन पलटी झाली. रिक्षाचालक शेख गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग देखभालचे कर्मचारी दस्तगीर आगा, अमित पवार, प्रकाश गायकवाड व गोटे ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांना उपचारासाठी तात्काळ कृष्णा रूग्णालयात हलवले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. घटनास्थळी कराड शहर पोलिस ठाण्याचे खालीद इनामदार व प्रशांत जाधव तात्काळ दाखल झाले.