उंब्रज,(प्रतिनिधी) – हिंगनोळे, ता. कराड येथील शेतात सोमवारी (दि. 18) ऊसतोड सुरू असताना, बिबट्याची दोन पिल्ले सापडली होती. वन विभागाने बिबट्याच्या मादीची पिल्लांशी पुनर्भेट घडवून आणली.
याबाबत माहिती अशी, हिंगनोळे येथील सौ. विद्या निवासराव माने यांच्या शेतात सोमवारी (दि. 18) ऊसतोड सुरू असताना, दुपारी 1 च्या सुमारास उसाच्या सरीत बिबट्याची दोन पिल्ले कामगारांना दिसली. त्यांनी याबाबत सौ. माने यांना माहिती दिली. सौ. माने यांनी वनपाल सागर कुंभार यांना ही माहिती देताच, त्यांनी हिंगनोळे येथे धाव घेऊन पिल्लांना ताब्यात घेतले.
त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी तुषार नवले यांनी संध्याकाळी 5.30 वाजता पिल्ले क्रेटमध्ये ठेवून, तेथे कॅमेरे लावले. बिबट्याची मादी संध्याकाळी 7.30 वाजता येऊन, एका पिल्लाला घेऊन गेली. पहिले पिल्लू सुरक्षित ठिकाणी ठेवून, तिने दुसरे पिल्लू रात्री 8.20 वाजता नेले.
वनक्षेत्रपाल तुषार नवले, परीविक्षाधीन वनक्षेत्रपाल सुजाता वीरकर, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, वनपाल सागर कुंभार, वनरक्षक सचिन खंडागळे, मेजर अरविंद जाधव, वनसेवक शंभू माने, कराडच्या वाइल्ड लाइफ रेस्क्यूअर्सचे अजय महाडिक, गणेश काळे, रोहित कुलकर्णी, रोहित पवार, अनिल कोळी, सचिन मोहिते यांनी मोलाची भूमिका बजावली.