सातारा, (प्रतिनिधी) – पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सातारा शहरानजीक शिखर प्रदीप श्रीवास्तव (रा. गोमतीनगर, लखनौ, उत्तर प्रदेश, सध्या रा. यशोदानगर) या युवकाला चार जणांनी कोयत्याचा धाक दाखवून, त्याच्याकडून साडेसात हजार रुपये रक्कम लुटल्याची घटना सोमवारी (दि. 18) रात्री घडली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिखर श्रीवास्तव यांची गाडी चार चोरट्यांनी पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर अडवली. तुम्ही अपघात केला आहे. या अपघातात आम्हाला मार लागला आहे,
असे म्हणून चौघांनी श्रीवास्तव यांना धमकावले. कोयत्याचा धाक दाखवून कार फोडून टाकण्याची धमकी देत, चौघांनी श्रीवास्तव यांच्याकडील साडेसात हजार रुपये जबरदस्तीने काढून घेऊन पलायन केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एस. के. उमाप तपास करत आहेत.