महाबळेश्वर (प्रतिनिधी) – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 कामी सातारा लोकसभा मतदार संघ अंतर्गत वाई विधानसभा मतदार संघात दि. ७ रोजी महाबळेश्वर तालुक्यातील एकूण १२९ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे.
वाई मतदार संघातील महाबळेश्वर तालुकेत १२९ मतदान केंद्र आहेत त्यापैकी शहरी भागातील एकूण २१ व ग्रामीण भागातील एकूण १०८ मतदान केंद्र आहेत. निवडणूकीच्या अनुषंगाने मतदार संघातील महाबळेश्वर येथील मंगळवारी भरणारा आठवडे बाजार बंद ठेवण्याचा आदेश पारीत करणेत आलेले आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा अनुषंगाने पोलीस विभागामार्फत प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक तो बंदोबस्त तैनात केला आहे, तसेच मतदार संघातील संवेदनशील मतदान केंद्रावर जादा पोलीस बंदोबस्त पुरविण्यात आलेला आहे.
महाबळेश्वर तालुकेतील १२९ मतदान केंद्रासाठी एकूण ३२ क्षेत्रिय अधिकारी यांची नियुक्ती असून तसेच मतदान केंद्रावर आवश्यक तो कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. अधिकारी / कर्मचारी यांना प्रशिक्षण दिले असून मतदान केंद्रावर आवश्यक ते साहित्य पुरविण्यात येणार आहे.
मतदानासाठी वापरण्यात येणारे मशीन वाई येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ येथील गोदामात सीलंबद करून ठेवली असून मशीन सुरक्षेसाठी आवश्यक तो पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.तिन्ही तालुक्यांमध्ये स्वीप अंतर्गत घरोघरी जावून मतदार जनजागृती करण्यात आलेली आहे.
महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम भागासाठी ३ पथके तयार असून १८ केंद्रासाठी वॉकीटॉकीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. प्रत्येक मतदान केंद्रासाठी दोन रनर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
चकदेव युनिक मतदान केंद्र
महाबळेश्वर तालुक्यात चकदेव येथील मतदान केंद्र हे युनिक मतदान केंद्र म्हणून निवडलेले आहे. कारण सदर मतदान केंद्रावरील कर्मचारी सर्वप्रथम वाहनाने व नंतर 3 कि.मी ट्रेकींग करून पोहोचतात. तसेच मेटगुताड येथे आदर्श मतदान केंद्र स्थापन करण्यात आलेले आहे अशी माहिती अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार महाबळेश्वर तेजस्विनी खोचरे-पाटील यांनी दिली.