पदवीचे शेकडो विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत
पुणे – विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क न भरल्याच्या कारणावरून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने अनेक महाविद्यालयांतील पदवीच्या प्रथम व द्वितीय वर्षातील सर्वच विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. काही विद्यार्थ्यांनी शुल्क न भरल्याने सर्वच विद्यार्थ्यांचे निकाल प्रलंबित ठेवणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न महाविद्यालय प्रशासनाने उपस्थित केला आहे.
विद्यापीठाच्या पदवीच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या परीक्षेसाठी शुल्क भरण्याचे सूचना विद्यार्थ्यांना दिल्या होत्या. करोनामुळे परीक्षा शुल्क भरण्यास वेळोवेळी मुदतवाढही देण्यात आली. त्याचदरम्यान करोनामुळे अंतिम वर्ष वगळता सर्व विद्यार्थ्यांचे निकाल मागील गुणांवरून निकाल करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी शुल्कच भरले नाहीत.
दरवर्षी विद्यार्थी महाविद्यालयात परीक्षा अर्ज शुल्कासह जमा करतात. ती रक्कम महाविद्यालयतर्फे विद्यापीठाकडे सादर केली जात होती. यंदा करोनामुळे महाविद्यालयांकडून परीक्षा अर्ज तपासून घ्यायचे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी शुल्क विद्यापीठाकडे जमा करायचे, अशा सूचना होत्या. त्यानुसार विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क जमा केले. मात्र, काहींनी शुल्क न भरल्याने विद्यापीठाने संबंधित महाविद्यालयातील सर्वच विद्यार्थ्यांचे निकाल अडवून ठेवल्याचा आरोप प्राचार्यांनी केला आहे.
बॅकलॉग विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक
विद्यापीठाने परीक्षा शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे, अशा महाविद्यालयांचे निकाल राखीव ठेवले आहेत. विशेषत: काही विषय राहिले आहेत, अशा बॅकलॉग विद्यार्थ्यांनी शुल्क न भरल्याचे प्रमाण जास्त आहे. विद्यापीठाने निकाल राखीव ठेवल्याने महाविद्यालयांना संबंधित विद्यार्थ्यांकडे शुल्क भरण्यासाठी पाठपुरावा करावा लागत आहे. शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे 18 हजारांच्या आसपास असण्याची शक्यता आहे.
ज्या महाविद्यालयातील मोजक्याच विद्यार्थ्यांनी शुल्क भरले नाही, त्यांना महाविद्यालयाच्या हमीपत्रावरून निकाल दिला आहे. विद्यापीठ हे सुविधा देणारे केंद्र आहे. शुल्कासंदर्भात महाविद्यालयांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. जवळपास 60 लाख रुपये परीक्षा शुल्क प्रलंबित आहे.
– डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ