मेळाव्यात कष्टकऱ्यांचा सत्कार

पिंपरी  – कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र आणि महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ यांच्या संयुक्‍त विद्यमाने कष्टकरी कामगार मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात कष्टकऱ्यांना पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.

या मेळाव्यास खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, महापौर राहुल जाधव, नगरसेवक तुषार हिंगे, महासंघाचे अध्यक्ष काशीनाथ नखाते आदी उपस्थित होते. यावेळी गौतम हातागळे व संगीता कांबळे यांना श्रम प्रतिष्ठा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कामगाराना अत्यावश्‍यक सुरक्षा साधने, कष्टकरी पेंशन कार्ड, विमा संरक्षण वितरण आणि विविध लाभाचे वाटप करण्यात आले.

नखाते म्हणाले की, आज देशभरात 93 टक्के असंघटित कामगार आहे. या असंघटित कष्टकरी वर्गासाठी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी सामाजिक सुरक्षा योजना कायदा केला. राज्य सरकारवर अमलात आणण्याची जबाबदारी टाकली. मात्र राज्य सरकारने 2008 साली अपुऱ्या निधीचे कारण पुढे करून हात झटकले. यामुळे बऱ्याच योजनेपासून असंघटित कामगार वंचित राहिले आहे. कष्टकरी वर्गाच्या जीवनाला संघर्षाची धार आहे. वारंवार पालिकेच्या कारवाईला सामोरे जावे लागते. “हॉकर्स झोन’ ची निर्मिती करून जागेचा प्रश्‍न मार्गी लावावा. संयुक्‍त राष्ट्रसंघाने कामगारांच्या श्रमाला प्रतिष्ठा दिली. मात्र आपल्या देशात या कायद्याचा गळा घोटला जातो. स्मार्ट सिटीत आमच्या कष्टकरी वर्गाला सामावून घ्यावे. विधवांना मनपाकडून पेंशन सुरू व्हावी, अशा समस्यांचा पाढा सत्ताधाऱ्यांसमोरच वाचला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता तरटे यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.