विकटविनायक रथातून निघणार दगडूशेठची मिरवणूक

पुणे – श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या गणेशाची मिरवणूक आकर्षक नक्षीकाम असणाऱ्या रथातून निघणार आहे. यंदा विकटविनायक रथात दगडूशेठचे बाप्पा विराजमान होणार असून, 1 लाख 21 हजार एलईडी बल्बमध्ये हा रथ उजळून निघणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली.

रथावर 8 खांब आहेत. रथाचा आकार 15 बाय 15 फूट असून उंची 22 फूट आहे. रथावर 1 मुख्य कळस आहे. सप्तरंगांमध्ये दिव्यांचा वापर केला आहे. रथावर तिरंगी रंग देखील पूर्णवेळ असणार आहे, असे गोडसे म्हणाले. मुद्‌गल पुराणात गणपतीच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. त्यापैकी “विकट’ हा सहावा अवतार असून तो सूर्याचे प्रतीक आहे. त्याने कामासुराचा वध केला, अशी कथा मुद्‌गल पुराणात वर्णिली असून हे कथासूत्र या रथाच्या देखाव्याची पार्श्‍वभूमी आहे. हा रथ यंदाची सजावट असलेल्या श्री गणेश सूर्यमंदिर संकल्पनेला सुसंगत आहे, असे गोडसे यांनी नमूद केले.

अशी असेल मिरवणूक
यंदाच्या मिरवणुकीत “मानवसेवा रथ’ असणार आहे. त्यात सामाजिक विषय मांडले जातील. यावर्षी “लोकसहभाग आणि गणेश मंडळाच्या पुढाकारातून नदीचे रक्षण’ असा विषय मांडला जाईल. याखेरीज मिरवणुकीत प्रभात ब्रास बॅंड, दरबार ब्रास बॅंड, स्वरूप वर्धिनीचे ढोल-लेझिम पथक, सनई-चौघडा यांचे वादन होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.