महापौरांची आज निवड

भाजपकडून सावध पवित्रा; नगरसेवक
गैरहजर राहिल्यास शिस्तभंगाची कारवाई
पिंपरी (प्रतिनिधी) –पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाच्या निवडीसाठी शुक्रवारी (दि.22) सकाळी अकरा वाजता विशेष सभा होणार आहे. या सभेत नव्या महापौराची निवड प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
महापौरपद हे सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव आहे. त्यासाठी सत्ताधारी भाजपकडून सांगवीच्या ज्येष्ठ नगरसेविका उषा ऊर्फ माई ढोरे यांचा अर्ज दाखल झाला आहे. तर, उपमहापौरपदासाठी क्रीडा समिती सभापती तुषार हिंगे यांचा एकमेव अर्ज आहे. पालिकेत भाजपचे 77 आणि संलग्न अपक्ष 5 असे एकूण 82 संख्याबळ आहे. त्यानुसार भाजपचा उमेदवार निवडून येण्याची शक्‍यता आहे.

विरोधी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून महापौरपदासाठी दापोडीच्या ज्येष्ठ नगरसेविका स्वाती उर्फ माई काटे आणि उपमहापौरपदासाठी दापोडीचे नगरसेवक राजू बनसोडे यांनी अर्ज दाखल केला आहे. पालिकेत राष्ट्रवादीचे संख्याबळ 36 आहे. शिवसेनेचे 9 आणि मनसेचा 1 नगरसेवक आहे. या तीनही विरोधकांनी एकत्रित मूठ बांधल्यास 46 इतकी संख्या होते. ही संख्या विजयासाठी पुरेशी नाही. प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी शिवसेना व मनसे काय भूमिका घेते, यावरही बरचे काही अवलंबून आहे. मूळ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे असलेले भाजपाचे नगरसेवक राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मदत करतील, असा दावा राष्ट्रवादीकडून केला जात आहे. त्यात किती तथ्य आहे, हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे. तर, भाजप नेत्यांनी आमचा एकही नगरसेवक फुटणार नाही, असा दावा केला आहे.

नगरसेवकांना “व्हीप’
पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त शंतनू गोयल यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी अकरा वाजता विशेष सभा सुरू होणार आहे. प्रथम महापौरपदाची निवडणूक होईल. अर्ज माघारीसाठी 15 मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे. अर्ज माघारी घेतल्यास बिनविरोध निवड जाहीर केली जाईल. अर्ज माघारी न घेतल्यास हात वर करून मतदान घेतले जाईल. त्यानंतर उपमहापौरपदाची याच पद्धतीने निवडणूक होणार आहे. या निवडणूक प्रकियेचे व्हिडिओ चित्रीकरण केले जाणार आहे, असे नगरसचिव उल्हास जगताप यांनी सांगितले. दरम्यान, गैरहजर राहणाऱ्या नगरसेवकांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाऊ शकते. प्रसंगी नगरसेवकपद धोक्‍यात येऊ शकते. सभेला उपस्थित राहून आपल्या पक्षाच्या उमेदवारांला मतदान करण्याचा व्हीप भाजप आणि राष्ट्रवादीने बजावला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.