ऐन सणासुदीमध्ये महागाई भडकली

जीवनावश्‍यक वस्तू महाग, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

पिंपरी  – मार्च महिन्यापासून स्थिर असलेल्या किराणा व भुसार मालाचे दर ऐन गणेशोत्सवात आणि श्राद्ध पक्ष व घटस्थापनेपूर्वी 10 ते 30 टक्‍क्‍यांनी वाढले आहेत. अचानक झालेल्या या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे. सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सव, श्राद्धपक्ष आणि घटस्थापना असल्याने नागरिकांनी मोठ्या प्रमाणात किराणा खरेदी केली आहे. परंतु महागाईमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.

मागील काही दिवसांपासून सर्वच क्षेत्रामध्ये महागाईच्या झळा सोसाव्या लागत असताना आता किराणा व भुसार मालांच्या किंमतीमध्येही फारशी वाढ झाली नव्हती. ठराविक वस्तू वगळता इतर मालांचे दर स्थिर होते. मात्र, आता सप्टेंबर महिन्यापासून सणांचा हंगाम सुरु होताच किराणा व भुसार मालांच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. किराणा मालामध्ये मिळणाऱ्या साखर, शेंगदाणे, साबूदाना, तूरडाळ, खाद्य तेलाच्या दरामध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. गणेशोत्सवाच्या अगोदरपासून सुरू असलेली दरवाढ कायम असल्यामुळे खरेदी करताना अनेकांनी आखडता हात घेतल्याचेच बाजारपेठेतील कमी झालेल्या गर्दीमुळे स्पष्ट होत आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे सरकारकडून महागाई नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले जात असले तरी गेल्या एका वर्षात किराणा मालाच्या दरामध्ये 25 ते 30 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. आता पुढील महिन्यात दसरा आणि दिवाळीचे सण आहेत. या काळातही काही प्रमाणात किरणा मालाच्या किंमतीमध्ये वाढ होण्याची शक्‍यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. त्यामुळे, सणासुदीच्या हंगामात सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा फटका सहन करावा लागणार हे निश्‍चित. विशेष म्हणजे नवरात्रीत मोठ्या संख्येने भाविक उपवास करतात, त्यापूर्वीच शेंगदाणे, साबुदाणा आणि तेलांच्या दरात मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)